अभिनयाच्या बादशहापुढे रोजी-रोटीचे ‘मिलिंद’ प्रश्न
नागपूर - सत्तर अल्बम, दहा दोन अंकी नाटके, तीन टीव्ही मालिका, बारा पथनाट्ये आणि महानाट्यांतील अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मिलिंद रामटेके यांना भेटण्यासाठी आज सकाळी फोन केला. त्यावर `भाऊ, मी तर ठेकेदाराकडे निघालो हातमजुरीसाठी`, असे मनाला चटका लावणारे उत्तर मिळाले. अभिनयाच्या बादशाहाला पडलेले रोजी रोटी प्रश्न विषमतावादी कलाप्रांताला सोडविता तर आलेच नाही, चळवळीतील दिग्गजांनाही दिङ्मुढ करणारे ठरले आहे.
कलावंत आपल्या जीवनाची विफलता ध्यानी न घेता कलेचे व्रत स्वीकारतात. ते कलेने पछाडलेले असतात. ऐश्वर्य किंवा दारिद्र्य याची बेरीज-वजाबाकी प्रामाणिक कलावंत करत नाहीत. वजाबाकी होणार याचे भय त्यांना नसते. खऱ्या कलावंताच्या सुखदुःखाच्या कल्पना निराळ्याच असतात. रंगमंचावर दाद मिळाली की, ते आनंदयात्री बनतात, असाच हा एक कलावंत पोटात भूक घेऊन कलेच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश देतो. आतड्यांना ताण पडेपर्यंत ओरडून सांगताना व्याकूळ होतो. परंतु ओठावरील संवादातून ‘पोटात तुझ्या पेटली आग...उठ दलिता तोफा डाग…` अशी हाक देतो. निखाऱ्यासारखा लालबुंद कलावंताचे नाव आहे मिलिंद रामटेके.
शॉर्ट फिल्म आणि मालिकाही
अशोक जांभूळकर दिग्दर्शित ‘सम्राट अशोक’ मधून मिलिंदचा अभिनय वास्तववादी होत गेल्याने ‘मंग्या,’ शॉर्ट फिल्म मधून खाटीक साकारण्याची संधी मिलिंदला मिळाली. यानंतर ‘रद्दी’ शॉर्ट फिल्म केली. पुढे ‘भारत का संविधान’, ‘रमाई’ या मालिकांमध्ये मिलिंदने टीव्हीवरच्या पडद्यावर काम केले.
हातमजुरीवर आयुष्याचा गाडा
अभिनयाला दाद मिळत होती, मात्र हा कलादालनातील अभिनयाचा बादशाह मिलिंद रामटेके वैयक्तिक आयुष्यात मात्र कफल्लक आहे. गंगाबाई घाटाजवळच्या गुजरनगरात पत्नी अलकाच्या सोबतीने हातात सुईदोरा घेऊन आदिती आणि उपाली या दोन्ही मुलींचे आयुष्य शिवण्यासाठी हातमजुरीवर आयुष्याचा गाडा ओढणे सुरू आहे. एक कलावंत एका सिनेमात काम करून घरकुल मिळवतो. तर दुसरा समाज जागविण्यासाठी हातात कलेची मशाल घेतो. परंतु त्याला आयुष्यभर मजुरी करावी लागते. हे भयावह वास्तव कधी पुसले जाईल? हाच एक विचार मिलिंदने बोलून दाखवला.
छत्तीगढी सिनेमातही धुम
अभिनयाच्या जोरावर मिलिंद रामटेके यांना ''छत्तीसगढीया सबसे बढिया’, ‘दाई’ हे दोन छत्तीसगडमधील सिनेेमे करण्याची संधी मिळाली. नागपुरातील `अमरदीप` आणि `राजविलास` टॉकीजमध्ये दोन्ही सिनेमाचे ‘शो’ लावण्यात आले होते.
नाटकांतून जिंकले मन
तीस वर्षांपूर्वीचा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा तो काळ. १९८९ साल. उमेदीच्या वयात कमलाकर डहाट लिखित ‘बाजार’ नाट्यातून रंगमंचावर मिलिंदने पाऊल ठेवले. संवाद फेकीची लकब लईच भारी असल्याने जॉनी मेश्राम यांच्या ‘आग्याबेंताल’, संजय जीवने यांच्या `पैदागीर`, जावेद पाशा यांच्या ‘स्वातंत्र्याचे मळे’, शीतल दोडके यांच्या ‘विकृती’ नाटकातील अभिनयाने मिलिंद जग जिंकणार असे दिसत होते.
अमोल पालेकरसोबतही काम
नाटकांतून रसिकांच्या मनावर राज्य करतानाच पथनाट्यातून मिलिंदने ‘गर्जना’ केली. ‘बालिका’पासून तर ‘मंडल आयोग’, ‘शेडेश्वर यात्रे’सह सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ‘पडघम’ मधून रस्त्यावर बुलंद आवाजाने त्याने जिंकले. नाट्यातून महानाट्यात झेप घेत प्रा. सुनील रामटेकेंच्या `महासूर्य`, शैलेंद्र कृष्णाच्या ‘तथागत’, विलास कुबडेंच्या ‘क्रांतीनायक’, प्रेमकुमार उकेंच्या ‘हर्षवर्धन’, `अंगुलीमाल’, शीतल दोडकेंचे ‘गाडगेबाबा’ आदीतून काम केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.