Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : आज जयंती जगाच्या महानायकाची; निळ्या पाखरांचा जल्लोष

शनिवारी भंते आर्या नागार्जुन सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनात निळ्या पाखरांनी ‘भीमराया... माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया’ या गीताच्या तालावर जल्लोष साजरा करीत डॉ. आंबेडकर धम्मज्योत काढली.
sakal
Dr. Babasaheb Ambedkar jayanti CelebrationDr. Babasaheb Ambedkar jayanti Celebration
Updated on

नागपूर - ज्यांच्या आयुष्याचे सारे ऋतू गोठवले गेले होते, आयुष्यातले सारे मौसम करपून गेले होते, त्यांच्या जीवनातले सारे उत्सवच कुस्करून टाकले गेले होते, त्यांच्यासाठी आपल्या मसिहाचा जन्मदिन एखाद्या महान राष्ट्रोत्सवापेक्षा कमी नसतो, हे दाखवण्यासाठी जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ढोल ताशांचे पथके वाजवत, बाबासाबेबांचे देखावे तयार करीत, चित्ररथांवर बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रसंग चितारून तर कोण्या वाचनालयात १२ तासांचे वाचन करून तर कोण्या तांड्यावर वही पेन भेट देऊन भेट देऊन जयंती सोहळा साजरा होत आहे.

शनिवारी भंते आर्या नागार्जुन सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनात निळ्या पाखरांनी ‘भीमराया... माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया’ या गीताच्या तालावर जल्लोष साजरा करीत डॉ. आंबेडकर धम्मज्योत काढली. संविधान चौकात मध्यरात्री १२ च्या ठोक्याला पोचली. तर आंबेडकरी विचारांची प्रयोगशाळा असलेली दीक्षाभूमी रोषनाईने सजविण्यात आली.

शनिवार, १३ एप्रिलला रात्री ९ वाजता इंदोरा बुद्धविहारातून डॉ.आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी बुद्धवंदनेनंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी संविधान चौकात उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला.

रात्री उशिरापर्यंत ते सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. इंदोरा बुद्धविहार, अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायींच्या संयुक्त वतीने निघालेल्या डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत उपासक, उपासिका आणि अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून निळा गुलाल उधळीत सहभागी झाले होते.

तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांचे छायाचित्र असलेले तसेच इतर देखाव्यांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पंचशील ध्वज, निळी टोपी लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीत भंते धम्मप्रकाश, महानागा, भंते प्रज्ञा बोधी, धम्म बोधी, भीमा बोधी, भते नागानंद, भंते संघघोष, भंते नागसेन, विनयशील, धम्मशील, अश्वजित, धम्म विजय, मिलिंद, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, धम्मसुधा, किसा गौतमी, पुन्नीका, धम्मशीला, धम्मप्रिया, संघमित्रा, बोधी आर्या, आम्रपाली, इंदोरा बुद्धविहार कमिटीचे सचिव अमित गडपायले, अ‍ॅड. भास्कर धमगाये, अ‍ॅड. अजय निकोसे, विजय इंदूरकर, आनंद राऊत, विक्रांत गजभिये, नितीन गणवीर, सुनील अंडरसहारे, रोशन उके यांनी सहकार्य केले.

बुद्ध शरण गच्छामी...

‘बुद्धम शरणम् गच्छामी। धम्मम शरणम् गच्छामी। संघम शरणम् गच्छामी।’ बुद्धवंदना म्हणत मिरवणूक इंदोरा चौक, कामठी मार्ग, गड्डीगोदाम, लिबर्टी टॉकीज मार्गाने संविधान चौकात पोहोचली. भदंत ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदनेनंतर ससाईंनी अनुयायांना मार्गदर्शन केले.

यासोबतच शहरातील प्रत्येक बुद्धविहारातून निघालेली मिरवणूक मध्यरात्री १२ वाजता संविधान चौकात पोचली. अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. लख्ख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता. संविधान चौक निळ्या पाखरांनी फुलला होता. निळ्या गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भीम जल्लोष पहाटेपर्यंत सुरू होता. बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणार्‍या गीतांमुळे अनुयायांमध्ये जोश संचारला होता.

दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि डॉ. आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेबांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी परिसरातील प्रांगणात रविवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता वरिष्ठ पत्रकार व साहित्यिक राजू परुळेकर (पुणे) आणि लखनऊ विद्यापीठाचे डॉ. रविकांत यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई असतील.

‘राष्ट्रनिर्माणाकरिता डॉ. आंबेडकरांचे योगदान’ हा प्रबोधनाचा विषय असून परुळेकर हे ‘लोकशाही आणि वर्तमानातील आव्हाने’ या विषयावर तर डॉ. रविकांत हे ‘बदलत्या दृष्टिकोनातून संविधानाचे महत्त्व आणि संरक्षण’ या विषयावर संबोधन करतील. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनाइजशन‌, जमाते-ए-एस्लामे हिंदच्या झुबिया फिरदोस, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मीना भागवतकर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या नंदा देशमुख उपस्थित असतील.

कामगार कल्याण मंडळाद्वारे परिसंवाद

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता ‘डॉ. आंबेडकर कामगार चळवळीचे उद्दीष्टे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धार्थ गायकवाड असतील.

परिसंवादात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे राज्य समन्वयक हेमंत वाघमारे,मार्पल ग्लोबलचे प्रमोद सांगोळे, प्रा. राजेश घोडेश्वार, प्रा. प्रकाश सहारे, पल्लवी गजभिये, सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड विचार व्यक्त करील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे, कल्याण निरीक्षक कांचन वाणी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.