नागपूर : दहा-बारा वर्षांपूर्वी दिव्यांग कमलेश लांजेवारने खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा "स्पोर्टस कोट्या'तून एखादी नोकरी मिळवून चांगले आयुष्य जगण्याची आस केली होती. एक नव्हे, दोन नव्हे, चक्क चार क्रीडा प्रकारांमध्ये त्याने स्वत:चे टॅलेंट सिद्ध केले. चांगल्या कामगिरीबद्दल राज्य शासनाने त्याच्या पाठीवर शाबासकीची थापही मारली. मात्र, त्यानंतरही कमलेशवर नागपूरच्या रस्त्यावर ई-रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली. आता लॉकडाउनमुळे ई-रिक्षा बंद असल्याने तो अडचणीत आला आहे.
जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या कमलेशच्या आयुष्यात लहानपणापासूनच दु:ख, संघर्ष आणि आर्थिक अडचण पाचवीला पुजली आहे. अवघ्या नऊ महिन्यांचा असताना ताप व पोलिओच्या अटॅकने संपूर्ण शरीर अपंग झाले. जवळपास वर्षभर कोमात राहावे लागले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून त्याचे प्राण वाचविले. मात्र, पोलिओमुळे डावा पाय कायमचा लुळा पडला. धडधाकट शरीर दिव्यांग झाल्याचे दु:ख मनात साठवून नव्या उमेदीने आयुष्य जगत असतानाच कमलेशची भेट सचिन लोणकरशी झाली. सचिनने दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धा होत असल्याचे सांगितल्यानंतर कमलेशने नशीब आजमावण्याचे ठरविले. अर्जुन पुरस्कारविजेते विजय मुनिश्वरसारखा गुरू मिळाल्यानंतर त्याचा क्रीडा प्रवास सुरू झाला. नाशिक येथे झालेल्या पहिल्याच राज्य स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर कमलेशने मागे वळून पाहिले नाही.
कमलेशने केवळ पॉवरलिफ्टिंगच नव्हे, ऍथलेटिक्स, टेबलटेनिस आणि सीटिंग व्हॉलीबॉल या खेळांमध्येही राज्य व राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला. एका तपाच्या काळात त्याने दिव्यांगांच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये सातवेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ऍथलेटिक्स स्पर्धेत सहावेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून ब्रॉंझपदक जिंकले. टेबलटेनिसमध्येही राज्यस्तरावर पदकाची कमाई केली. शिवाय सीटिंग व्हॉलीबॉलमध्येसुद्धा राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविली. या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य सरकारतर्फे त्याला 2015-16 मध्ये प्रतिष्ठेच्या एकलव्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले.
आणखी वाचा - आता प्राथमिक वर्गांनाही शिकविणार बीएड पास मास्तर
37 वर्षीय कमलेशने नोकरीसाठी रेल्वे, नागपूर सुधार प्रन्यास, जनसंपर्क विभागासह अनेक ठिकाणी हातपाय मारले. मात्र, कुणीही त्याच्या क्रीडागुणांची कदर केली नाही. "स्पोर्टस कोट्या'तून नोकरी न मिळाल्याने नाईलाजाने त्याच्यावर उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा चालविण्याची वेळ आली. नागपूरच्या रस्त्यावर दिवसभर उन्हातान्हात रिक्षा चालवून हाती पडणाऱ्या चारशे-पाचशे रुपयांत त्याचा कसाबसा उदरनिर्वाह सुरू आहे. मध्य रेल्वेत ट्रॅकमन राहिलेल्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर आईला मिळणाऱ्या पेंशनचा थोडाफार आधार आहे. कमलेशच्या परिवारात आई, पत्नी व धाकटा भाऊ आहे. लॉकडाउनमुळे सध्या रिक्षा बंद असल्यामुळे आर्थिक चणचण जाणवत असल्याचे कमलेशने सांगितले.
चार क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करूनही माझ्यासारख्या दिव्यांग खेळाडूला उदरनिर्वाहासाठी उन्हातान्हात रिक्षा चालवावे लागते आहे, याबद्दल खूप वाईट वाटते. दिव्यांग खेळाडूंचे इतके हाल होत असतील, तर भविष्यात ते खेळात कसे काय करिअर करतील? मला शासनाने पुरस्कार अवश्य दिला. पण, तो भिंतीला टांगण्याशिवाय माझ्यासाठी त्या पुरस्काराचा दुसरा काहीच उपयोग नाही.
कमलेश लांजेवार, एकलव्य पुरस्कार विजेता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.