कोरोनाबाधिताचा मृतदेह वाहून नेणाऱ्या रुग्णवाहिकेतूनच आणतात जेवण; या कोविड हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव 

file photo
file photo
Updated on

नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठे असे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल). या मेडिकलमध्ये कोरोनावरील उपचारासाठी राज्यात सर्वांत आधी कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. मात्र, या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक त्या बाबी पाळल्या जात नाहीत. कोरोनाने दगावलेल्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवागारात पोहोचवण्यात येतो. मात्र, याच रुग्णवाहिकेतून येथील कर्मचाऱ्यांसाठी जेवण आणले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे येथील कर्मचारी कोरोनाच्या रडावर आहेत. 

मेडिकल आता कोरोनाचे माहेरघर होत असल्याचे दिसून येते. येथे सध्या सेवा देणारे कर्मचारी, डॉक्‍टर, परिचारिका कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यातच मृत्यूचा टक्का वाढल्यामुळे येथील कर्मचारी दहशतीत आहेत. अशा वेळी ज्या रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधिताचे शव पोहोचवण्यात येते, त्याच रुग्णवाहिकेतून जेवण आणले जात असल्यामुळे कर्मचारी घाबरले आहेत. कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची भीती त्यांच्या मनात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतररष्ट्रीय विमानतळ प्रशासनातर्फे सहा महिन्यांपूर्वी एमएच-31- एफसी-4642 हा क्रमांक असलेली रुग्णवाहिका मेडिकलला भेट दिली. रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग होतो. 

रुग्णवाहिकेचा शववाहिका म्हणून उपयोग करणे योग्य नाही. परंतु, ही रुग्णवाहिका शववाहिका बनते. प्रसंगी जेवण तसेच कोरोनाबाधित तसेच निगेटिव्ह रुग्ण ने-आण करण्यासाठीही वापरली जाते. रुग्णवाहिकेमधून जेवणाचे डबे, भाजीपाला, सिलिंडर, पलंग, गाद्या, ब्लॅंकेट अशा प्रकारची वाहतूक केली जात असल्याचे पुढे आले. यासंदर्भात प्रशासन अनभिज्ञ आहे की प्रशासनाच्या निर्देशानेच हे होत आहे, हे कळायला मार्ग नाही. 

जुन्या रुग्णवाहिकेला बनवावे शववाहिका 
मेडिकलमध्ये भंगार रुग्णवाहिका आहे. रुग्ण घेऊन जात असताना त्या रुग्णवाहिकेला नुकताच अपघात झाला होता. भंगार झालेल्या रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी आणि नवीन रुग्णवाहिकाचा कोरोनाबाधितांचे शव वाहून नेण्यासाठी वापर होत असल्याचे दिसून आले. हे मनाला पटण्यासारखे नाही. या प्रकरणाची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे एका संघटनेतर्फे सांगण्यात आले. यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. 

संपादन : मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.