नागपूर : रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे तोडण्यासाठी पोहोचलेल्या महापालिकेच्या पथकाला शुक्रवारी नागरिकांचा चांगलाच विरोध झाला. नागरिक आक्रमक झाल्याने तणाव यावेळी निर्माण झाला. अखेर दीडशेवर पोलिसांच्या ताफ्याच्या मदतीने शिवमंदिरासह १९ घरे तोडण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने नमुद केले.
लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा परिसरात रेणुका गृहनिर्माण सोसायटीच्या समोर ८० फुटांचा रस्ता प्रस्तावित आहे. परंतु या रस्त्यावर नागरिकांनी घरे बांधली. अनेकांनी पक्के बांधकाम केले, काहींनी टिनाचे शेड टाकून संसार थाटले. येथे नागरिकांनी शिवमंदिरही बांधले. एवढेच नव्हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही तयार करण्यात आला. हे अतिक्रमण काढण्यासाठी मुकेश इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे मुकेश तायवाडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने महापालिकेला रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे महापालिकेने येथील १९ घरांच्या प्रमुखांना १५ अतिक्रमण काढण्यासंदर्भात १ सप्टेंबरला नोटीस बजावली होती. परंतु महिना होऊनही अतिक्रमण काढले नसल्याने शुक्रवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक धडकले. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक बघताच स्थानिक नागरिकांत धडकी भरली. परंतु काही नागरिकांनी एकत्र येऊन या कारवाईचा विरोध केला. काहींना पथकाविरोधात घोषणाबाजी केली. काहींनी दगडही उचलले. सुरुवातीला काही प्रमाणात पोलिस सोबत होते.
नागरिकांचा रोष बघता आणखी पोलिस बोलावण्यात आले. त्यामुळे जवळपास दीडशे पोलिस येथे जमा झाले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांचा विरोध बघता त्यांना दम दिला. नागरिकांनी त्यांचे साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीडशे पोलिसांच्या संरक्षणात बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने पक्के तसेच टिनाचे शेड असलेली १९ घरे काही क्षणातच भूईसपाट करण्यात आली. या घरांसोबत परिसरात तयार करण्यात आलेले शिवमंदिरही तोडण्यात आले.
डॉ. आंबेडकर यांचा पुतळाही स्थानांतरित
या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात आला. हा पुतळा हटविण्यावरून चांगलाच वाद झाला. पोलिस व मनपा पथकातील कर्मचाऱ्यांनी समन्वयाने पुतळा दुसऱ्या ठिकाणी सन्मानाने स्थानांतरित करण्यात आला. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
होत्याचे नव्हते झाले
अनेक वर्षांपासून येथे नागरिकांनी संसार थाटला. काहींना येथेच मुलेही झाली. आज डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे पुरुष, महिलाही भावूक झाल्या. लहान मुलांचा निवारा गेल्याने आता कुठे आसरा शोधायचा, असा प्रश्न प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसून आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.