Kapoor Price : सणासुदीचे दिवस जवळ येताच कापराचे भाव वाढले; रासायनिक द्रव्यांच्या दरवाढीचा फटका

सणासुदीचे दिवस जवळ आल्याने कापराची मागणी वाढणार आहे. त्यातच कापूर तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांच्या दरात वाढ झाल्याने कापराच्या दराने विक्रम केला आहे. त्यामुळे दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत.
Kapoor Price
Kapoor Price Sakal
Updated on

Nagpur News : सणासुदीचे दिवस जवळ आल्याने कापराची मागणी वाढणार आहे. त्यातच कापूर तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांच्या दरात वाढ झाल्याने कापराच्या दराने विक्रम केला आहे. त्यामुळे दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात कच्च्या मालाची आवक कमी झाल्याने भाव वाढले होते. त्यानंतर दर काही अंशी कमी झाले असतानाच आता पुन्हा कापराच्या दराने नवीन भरारी घेतली आहे. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नसून दिवाळीनंतर ते कमी होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. देशात कापूर उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या आहेत.

दरवाढीने भाविकांच्या अंगात ‘कापरे’

कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने निर्मिती खर्च वाढला आहे. सध्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. रसायनांची दरवाढच कापराच्या भाववाढीचे मुख्य कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानंतरचे सलग चार महिने सणासुदीचे असणार आहे. विशेष म्हणजे नागपंचमी, गणेशोत्सव, दुर्गात्सव आदी सणांमध्ये कापराला विशेष मागणी असते. तीन महिन्यांपासून साधा कापराच्या वड्यांची किंमत ठोकमध्ये प्रती किलो ७०० ते ८०० रुपये होती. आता भाव १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळमध्ये १७०० ते १८०० हजार रुपयांपर्यंत ही किंमत आहे.

नागपंचमी, नवरात्रात अधिक मागणी

शहरात १५ ते २० कापूर उत्पादक आहेत. येथून छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, मराठवाडा या भागात विक्रीसाठी कापूर पाठविला जातो. छत्तीसगड व मध्यप्रदेशात देवी-देवतांची आरती कापूर जाळून केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते. गणेशोत्सव आणि नवरात्रात कापराची मागणी अधिक असते.

भीमसेनीच्या किमतीत प्रचंड वाढ

विदर्भात दगड्या (देशी) आणि पश्चिम महाराष्ट्रात भीमसेनी नावाने प्रचलित कापराची किंमत चार महिन्यात ६०० रुपयांनी वाढली आहे. ठोक बाजारात प्रती किलो १४५० ते १५०० रुपये असा दर आहे. किरकोळमध्ये २ हजार रुपयांत विक्री सुरू आहे. घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा कापूर जाळला जातो. या कापराची विक्री वाढल्याने दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले.

कापूर तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापराचे दर वाढतच आहेत. मागणी वाढल्याने सध्या भाव कमी होण्याची शक्यता नाही. नवरात्रोत्सवात मागणी वाढणार आहे. दिवाळीनंतर भाव कमी होतील.

- आदर्श देशमुख, व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.