धामणा-लिंगा (जि.नागपूर)ः `माणूस’ हा समजदार म्हणून तो सामाजिक प्राणी म्हणून गणला जातो. परंतू त्याच्या सामाजिक वागण्यावरुन शंका घेण्यास भाग पाडतात. अशा काही घटना अवतीभवती घडत असल्याचे पुरावे पहायला आणि ऐकायला मिळतात, तेव्हा ‘माणसापरिस कुत्री बरी’ असेच म्हणावे लागते. कारण कुत्रा हा माणसाळलेला प्राणी शेवटी त्याच्या प्रामाणिकपणात खरा उतरतो. अशीच एक घटना हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत घडली आणि माणसाच्या विचारशून्यतेवर हसावे की रडावे, असा प्रश्न निर्माण झाला.
धामणा (लिंगा) प्रभाग क्र.१ येथील झोपडपट्टी भागात एक महिला अंगणात झाडत असताना शेजारी राहत असलेल्याच्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या प्रयत्नात महिलेने त्याला ‘हाडंऽऽऽ’ म्हणून हाकलून लावल्याच्या कारणावरून कुत्र्याच्या मालकांनी महिलेला व पतीला तसेच म्हाताऱ्या सासूला जबर मारहाण केली. यात ते जखमी झाले. ही घटना शनिवारी(ता.५) सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली़. या प्रकरणी हिंगणा पोलिस ठाण्यात इंगोले परिवारातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली.
चित्रा मनोज गोबाडे (वय३०,धामणा-लिंगा) या घरासामोरचे अंगण झाडत असताना शेजारी राहत असलेले गैरअर्जदार दुर्वास इंगोले यांचा कुत्रा चित्रा गोबाडे यांच्या अंगावर धावला. गोबाडे यांनी कुत्र्याला ‘हाडंऽऽऽ’ म्हणून हाकलून लावले. कुत्रामालक दुर्वास इंगोले यांचा शिव्या दिल्याचा गैरसमज झाला. म्हणून दुर्वास इंगोले, पत्नी छाया व दोन मुलांनी लाकडी दांड्यानी गोबाडे दांपत्यास तसेच चित्रा, पती मनोज शामराव गोबाडे, सासू विमल शामराव गोबाडे (सर्व रा. धामणा-लिंगा) यांना अश्लील शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी व लाखडी दांड्यानी जबर मारहाण केली.
या हाणामारीत गोबाडे परिवारातील पती-पत्नी व सासू जखमी झाले़. ही घटना शनिवारी सायंकाळच्या दरम्यान हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणा (लिंगा) येथे घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
गोबाडे या गरीब कुंटुंबाला न्याय मिळावा व गैरअर्जदाराला शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच या मारहाणीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. गोबाडे या गरीब कुंटुंबाला न्याय मिळावा म्हणून ‘व्हायरल’ करण्यात आला आहे. हिंगणा पोलिस ठाण्यात दुर्वास, छाया इंगोले, निखिल इंगोले, मुलगा शितू यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील तपास हिंगणा वरिष्ठ पोलिस निरिक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमृता सोमवंशी, कमलाकर उईके करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.