नागपूर : बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत काछीपुरा येथील आठ गॅरेजची राख झाली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या डस्टर, स्विफ्ट डिझायर, मारुती कारसह पाच कार जळाल्या. मोठ्या प्रमाणात ऑइल, कुशनचे कापड, फोममुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत शेडसाठी वापरण्यात आलेल्या टिनाही वितळल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. गॅरेजमागील मोठ्या भिंतीमुळे काछीपुरा वस्ती थोडक्यात बचावली. भीतीमुळे काछीपुरावासींना रात्रभर जागरण करावे लागले.
रामदासपेठ ते बजाजनगर मार्गावर काछीपुरा वस्तीत मोठ्या प्रमाणात वाहने दुरुस्ती, सिट कव्हर, पेंटिंगचे गॅरेज आहेत. कोरोनाबाबतचे निर्बंध हटविल्यानंतर काल, दुसऱ्याच दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत गॅरेज सुरू होते. गॅरेज बंद करून संचालकही घरी गेले. ते गाढ झोपेत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास एका गॅरेजला आग लागली. त्यानंतर गॅरेजमध्ये असलेले ऑइल, कुशनचे फोम यामुळे आगीने क्षणात आठ गॅरेज व एक कार्यालय कवेत घेतले. यात राठोड ऑटोमोबाईल, न्यू नागपूर गॅरेज, जनता गॅरेज, हेमंत कुशन वर्क, गजानन वेल्डिंग वर्क्स, गुलजार ऑटो वर्क्स, व्यास ऑटो इलेक्ट्रिक, युवराज कुशन वर्क या गॅरेजसह ॲड. जितेंद्र राठोड यांचे कार्यालय व अक्षयलाल पांडे यांच्या घराचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
परिसरातील नागरिकांनीच आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे जवान येथे बंबांसह पोहोचले. त्यांनी तत्काळ आगीवर पाण्याचा मारा केला. परंतु, विद्युत प्रवाह सुरू असल्याने तो बंद होईस्तोवर त्यांनाही पाण्याचा मारा थांबवावा लागला, असे येथील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज बंद केल्यानंतर आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. तोपर्यंत गॅरेजमधील ऑइल, कुशन वर्कसाठी असलेले कापड, फोम, लेदर कपडा, शिवणयंत्र, कॉम्प्रेसर, स्पेअर पार्टसह दुरुस्तीसाठी आलेल्या कारही जळाल्या.
ऑइल, कुशनमुळे आगीच्या उंच ज्वाळा निर्माण झाल्या. त्यामुळे लगतच्याच वस्तीतील नागरिकांचीही झोप उडाली. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आठही गॅरेजमागे मोठी भिंत असून पलिकडे घरे आहेत. या भिंतीमुळे काछीपुरा वस्ती थोडक्यात बचावली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
२५ लाखांवर नुकसान
या आठही गॅरेजमधील मोठ्या प्रमाणात असलेले दुरुस्तीचे साहित्य जळून खाक झाले. फोम, कापड, शिवणयंत्र, कारच्या सिट, लेदर आदी जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाल्याचे हेमंत कुशन वर्क्सचे हेमंत काकडे यांनी सांगितले. याशिवाय डस्टर, स्विफ्ट डिझायर व इतर कारही जळाल्या. दुकानात कुठलीही वस्तु शिल्लक राहीली नाही, असे राठोड ऑटोमोबाईलचे जगदीश राठोड यांनी सांगितले.
दिवसभर भंगारवाल्यांची गर्दी
जळालेले सर्वच गॅरेज टिन पत्र्यांच्या शेडचे होते. या आगीत अक्षरशः टिना वितळल्या. याशिवाय मोठ्या प्रमाणात वाहने दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याचेही नुकसान झाले. टिना वितळल्याने त्या पुन्हा वापरात येण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे या टिना तसेच इतर कामात न येऊ शकणारे साहित्य घेण्यासाठी आज दिवसभर भंगार खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसून आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.