नागपूर - गणेशाच्या आगमनाचे काउंटडाऊन सुरू झाले असून, उपराजधानीतील गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण शहरात पोलिसांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यानुसार प्रत्येक ठिकाणी पोलिसांची ‘सेक्टर पेट्रोलिंग’ असणार आहे. शहरात साडेचार हजार पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात उद्यापासून गणेशोत्सवाची धूम असणार आहे. यादरम्यान कुठलीही अप्रिय घटना होऊ नये, याशिवाय सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यावर्षी ९१५ गणपती मंडळांद्वारे परवानगी घेण्यात आली आहे. त्यात ७५ मंडळातील गणपती हे सहा फुटाच्या वरचे आहेत.
बंदोबस्तासाठी शहर पोलिस दलातील साडेचार हजार पोलिसांशिवाय राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, होमगार्डचे १२०० जवान उपराजधानीत तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास १० पोलिस उपायुक्त, तीन अतिरिक्त उपायुक्त, १२ सहायक पोलिस उपायुक्त, ३०० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मोक्याचा ठिकाणी ‘वॉच टावर’
उपराजधानीतील चितारओळ, सीताबर्डी, गोकुळपेठ, इतवारी, मंगळवारी, सदर आदींसह मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्हीसह ‘वॉच टॉवर’ ही उभारण्यात आले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा आणि पार्किंग स्थळांवरील प्रत्येक संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी स्थानिक पोलिसांना तैनात करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधनाशक पथकालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा सर्वांसाठी उत्साहाचा सण आहे. यादरम्यान सर्वांनी तो निर्विघ्न कसा पार पाडता येईल याची काळजी घ्यावी. पोलिस सदैव आपल्या सहकार्यासाठी असून यादरम्यान कुणालाही त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावा.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, नागपूर शहर.
जिल्ह्यात २२०० पोलिस नागपूर जिल्ह्यात यंदा ४३६ सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक पोलिसांसह ८५० होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स, एक राज्य राखीव दलाची तुकडी, १८० पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांकडून पेट्रोलिंग पथक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.