नागपूर : लाडक्या श्रीगणेशाचे आगमन होताच सर्वांना वेध लागतात ते गौराईचे. शनिवारी गणेशमूर्ती घरोघरी विराजमान झाल्या. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात गौरीचे आवाहन होईल. तिचे स्वागत व स्थापनेसाठी नागपुरातील चितारओळीत नागरिकांची पावले वळू लागली असून देवीचे खळीदार हास्य असलेले मुखवटे विशेष पसंतीस उतरत आहे.
महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे गौरीचे पूजन केले जाते. विदर्भात ‘महालक्ष्मी आवाहन’ असा शब्द प्रचलित आहे. यात विशिष्ट पद्धतीने देवीला आसनस्थ केले जाते. बहुतेक घरी पिढ्यानपिढ्या चालत आलेले मुखवटे वापरून देवीची स्थापना होते. पण काही कारणाने कधी मुखवटे तर इतर साहित्य घेण्याची गरज पडते. यासाठी नागपुरातील चितारओळ प्रसिद्ध असून स्थापनेसाठी लागणारे मुखवटे, हात, पायल्या यासह इतरही साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे.