गुमगाव (जि. नागपूर) : कला कधी कुणावर प्रसन्न होईल व कुठे फुलेल हे, सांगता येत नाही. मिहान येथील मोठ्या कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत असणारे आणि मनाने बासरी वादक असलेले ३१ वर्षीय मिथुन चंद्र सेनन हे त्याचेच एक उदाहरण. मुळचे केरळमधील कोल्लम येथील आणि सध्या गुमगाव परिसरातील वृंदावन सिटीमध्ये राहणाऱ्या मिथुन यांची सुमधुर बासरी अनेकांना भुरळ घालत आहे.
मिथुन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी पहिल्यांदा शेजारी राहणाऱ्या मित्राकडून सहज वाजविण्यासाठी बासरी हातात घेतली. पहिल्याच प्रयत्नात त्यातून निघालेल्या सुमधुर स्वरांनी बासरी वादनाची त्यांच्या मनात आवड निर्माण झाली. बासरी वादनात असलेली आवड बघून वडिलांनी मिथुनच्या हातात कौतुकाने बासरी दिली.
ज्याच्या हातात आपण बासरी देतोय, त्याला संगीतविश्व हाक देत आहे, असे मिथुन यांच्या वडिलांच्या ध्यानीमनी नसावे. मिथुन यांनी त्याच बासरीने वादनाचा ‘श्रीगणेशा’ केला. जसजसे मिथुन मोठे होत गेले, तशीतशी त्यांची बासरी वादनातील आवड वाढतच गेली. अवघे आकाश कवेत घ्यायची उर्मी असलेल्या मिथुनच्या ‘बासरी’ने सध्या भल्याभल्यांना मोहित केलेले असून कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून आता मिथुनच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे.
बासरी शिकण्यासाठी कुठेही शिकवणी न लावता सध्या त्यांचे बासरीवादन प्रशिक्षित कलावंताला नक्कीच तोड देणारे ठरतील, असेच आहे. त्यांच्या या कलेमध्ये अर्धांगिनी निशा यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे मिथुन आवर्जून सांगतात.
बाजारातून विकत आणलेल्या बासरी वाजविण्यात मिथुन यांना अडचणी यायच्या. वादनातून समाधान मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच बासरी बनविण्याचा निर्धार केला. सुरुवातीला पीव्हीसी पाईपला छिद्र पाडून बासरी तयार केली. आता मिथुन स्वतःच बासरी बनवीत असून बासरी वादनासोबतच त्यांनी बनविलेल्या बासरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.