नागपूर : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. तसे पत्रही त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावे लिहिले आहे. यामुळे विजय वडेट्टीवार चांगलेच नाराज झाल्याचे दिसून येते. ‘एका बापाची अवलाद असशील, तर केलेल्या आरोपांचा एक तरी पुरावा आणून दे, नाही तर शिक्षा भोगायला तयार हो’ अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांच्या पत्राला उत्तर दिले.
महाविकासआघाडी व भाजप नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप वाढतच आहे. भाजपचे नेते सरकार पाडण्यावरून तर आघाडीतील नेते केंद्र सरकार करीत असलेल्या अन्यायावरून एकमेकांना टार्गेट करीत आहे. अशातच गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवार यांचे शिक्षण काढले. पडळकर यांनी त्यांचे शिक्षणच काढले नाही तर गोसेखुर्द प्रकल्पामध्ये ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे, दारूची फॅक्टरी विकत घेणे, दारूची डिलरशिप घेणे आदी गंभीर आरोप केले आहेत.
पडळकरांचे पत्र
‘अतिमाननीय विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय, मी मा. मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सचे गठन करण्याची मागणी केल्यानंतर निष्क्रिय दिग्गजांच्या मंत्रिमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली, बरे आहे. किंबहुना, आपण म्हणता ते खरे आहे. कारण, मला ओबीसी हितासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्यासाठी धारण करता आले नसते. किंबहुना मला आपल्यासारखे केवळ दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंडरस्टॅंडिंग न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधून दारूबंदी उठवता आली नसती. किंबहुना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरित करता आले नसते. नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल. मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते.’
वडेट्टीवार यांचे पत्र
`तू एका बापाची अवलाद असतील, तर एक तरी आरोप सिद्ध करून दाखव. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बेताल बोलत जाऊ नकोस. तुझ्यासारखे पातळी सोडून आम्ही बोलत नाही. कारण, राजकारणात प्रत्येकाचा मान सन्मान ठेवावा लागतो. छत्तीसगडमध्ये दारूची फॅक्टरी आहे, हे जर तू सिद्ध केले, तर ती फॅक्टरी तुझ्या नावाने करून देतो, तुझ्या खानदानीच्या नावाने करून देतो. माझ्या किंवा माझ्या नातेवाइकांच्या नावे, असे काहीही असेल तर ते सिद्ध करून दाखव, नाही तर शिक्षा भोगायला तयार हो. कारण, तुझ्या विरोधात ५० कोटींचा मानहानीचा दावा मी ठोकणार आहे.’
आधी माहिती घे
मी पाचवेळा विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलो आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे त्याने जो काही पत्रप्रपंच केला आहे. त्यात माझे शिक्षण काढण्यात आले आहे. त्याला मला सांगायचे आहे की ‘ज्या पक्षात तू आहे, त्या पक्षाचे शिक्षणमंत्री किती शिकले आहेत? कोकणातून आलेले नेते, जे आताच केंद्रात मंत्री झाले, ते किती शिकले आहेत. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री किती शिकले आहेत, याची माहिती आधी घे’ असा सल्ला वडेट्टीवार यांनी पडळकरांना दिला.
एक तरी आरोप सिद्ध करून दाखवा
हा पत्रप्रपंच तर पडळकरने केला, त्याला माझे एक सांगणे आहे की, आरोप जर सिद्ध करून दाखवला नाही, तर मानहानीचा ५० कोटींचा दावा टाकेल आणि चंद्रपूर-गडचिरोलीच्या चकरा मारायला लावेल. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये ठेकेदाराला टक्केवारी मागितली, दारूची फॅक्टरी विकत घेतली, डिलरशिप घेतली, असे अत्यंत हिन आरोप पडळकरांनी केले आहेत. टक्केवारी तर सोडाच एक रुपयासुद्धा कुणाकडून घेतलेला नाही. तर एका चहाचासुद्धा डागीनदार मी कुणाचा नाही. हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कुणीही सांगेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.