नागपूर : कोरोना आटोक्यात येत असताना जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप वाढला आहे. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांचे मृत्यू वाढत आहेत. मात्र मृत्यू विश्लेषण समितीमध्ये शिक्कामोर्तब न झाल्याने मृत्यूची नोंद लवकर होत नाही. एकट्या मेडिकलमध्ये १५ स्वाइन फ्लू संशयितांचे मृत्यू झाले आहेत. मात्र अद्याप समितीसमोर आले नाही. त्यात कोरोना आणि स्वाइन फ्लू पाठोपाठ आता स्क्रब टायफसने जिल्ह्यात नव्हेतर पूर्व विदर्भात एन्ट्री दिली आहे. नागपूर जिल्ह्यात २ आणि गोंदिया जिल्ह्यात २ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव झाल्याची माहिती पुढे आली असून अधिकाऱ्यांनी नागपूर आरोग्य विभागाला कोणतीही कळू न देता थेट पुण्याच्या आरोग्य विभागाकडे माहिती सादर केली. यामुळे स्क्रब टायफसचे रुग्ण आढळल्याची माहिती उजेडात आली. जिल्ह्यातील कळमेश्वर आणि काटोल या भागातील दोन ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण सध्या मेडिकलला उपचार घेत आहेत. एक रुग्ण गोंदिया जिल्ह्यातील तर दुसरा बालाघाट येथील आहे. दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळत नसतानाच अचानक पुन्हा हे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे २४ तासांत जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चे नवीन २० रुग्ण बुधवारी आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे.
१४१० चाचण्या; ४० बाधितांची भर
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप ओसरत आहे. दैनंदिन बाधितांच्या संख्येत रोज घट होत असून बुधवारी (ता.२४) जिल्ह्यात १४१० चाचण्या झाल्या. त्यापैकी ४० जण बाधित आढळले. दरम्यान बुधवारी शहरातून ३३ आणि ग्रामीणमधून ५ असे ३८ जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. बाधित वाढून कोरोनामुक्त वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्येत आपसुकच घट होत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक रुग्ण वाढल्याने सक्रिय बाधितांच्या संख्येत किंचीत वाढ झाली. बुधवारी शहरात २८९ आणि ग्रामीणमध्ये १२५ असे जिल्ह्यात ४१४ सक्रिय बाधित आहेत. यापैकी ३६ जणांवर मेयो, मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. तर ३७८ जण गृहविगीकरणात आहेत.
मृत्यूची नोंद कधी?
मागील २४ तासांत उपराजधानीत ११, शहराबाहेरील ९ असे एकूण २० स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील ‘स्वाईन फ्लू’बाधितांची संख्या १८४ झाली आहे. तर शहराबाहेरील १४३ अशी एकूण ३२७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांपैकी शहरातील ११६ आणि ग्रामीणचे ७५ असे एकूण १९१ जण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये या आजाराचे ११६ रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहेत. शहरात ४, ग्रामीणचे ७ असे एकूण ११ बाधित व्हेंटिलेटरवर आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.