सुरेश राठोड
Holi 2024 : भारतात बंजारा संस्कृती अतिप्राचीन आहे. गोर प्राचीन क्षत्रिय वंश आहे. मराठीत गोर असा उल्लेख होतो. गोर समाजातील लोकांना गोर बंजारा म्हणतात. संत सेवालाल महाराज यांना दैवत मानून सांस्कृतिक परंपरा जोपासणारा बंजारा समाज. निसर्गपूजक बंजारा समाज आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. या समाजात होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीपेक्षाही होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
ग्रामीण भागात दांडी पौर्णिमेपासून तर गुढीपाडव्यापर्यंत होळी साजरी करतात. लोकगीते या समाजाचे आकर्षण आहे. पारंपरिक पेहराव या समाजातील विशेष आकर्षण आहे. हा पेहराव या समाजातील स्त्रिया स्वतः शिवून तयार करतात. दांडी पौर्णिमेपासून होळीला सुरुवात होत असताना लेंगी गीतांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील लोक विशिष्ट एका ठिकाणी येऊन हे गीत म्हणतात.
नाव डुबी चाली पाळीम काळ मोटो...
दोन हाक मारू भाया कतेसी बेटो रे...
भाया मारी नावे भरूच रे मोती...
हेल डूबजाय नाव मन आहे तोटो...
डफ वाजवून, लेंगी गीतामध्ये समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, समाज एकीकरण जीवनाविषयी, हुंडाबंदी, शिक्षणाचे महत्त्व, समाजाचा संघर्ष, रीतिरिवाज इत्यादी विषयांवर लेंगी गीत असतात. या सणात समाजातील लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सारेच सहभागी होतात.
नियोजित दिवशी होळी न पेटवता बंजारा समाजात दुसऱ्या दिवशी होळी पेटवली जाते. त्यामागील पार्श्वभूमी म्हणजे, प्राचीन काळात होळीची लाकडे आणण्यासाठी समाजातील उपवर तरुण एरंडीच्या झाडाची लाकडे तोडण्यासाठी गेले असता झाडाची फांदी तोडल्याने तेथील राजाने रात्रभर त्यांना बंदी बनवून ठेवले.
दुसऱ्या दिवशी त्या तरुणांना सोडवून आणले. त्या आनंदात सकाळी होळी पेटविण्यात आली. तेव्हापासून बंजारा समाजात दुसऱ्या दिवशी होळी पेटवली जाते.
होळीचा आदल्या दिवशी संध्याकाळी जिथे होळी पेटवली जाते तिथे समाजप्रमुखाच्या उपस्थितीत सभा भरवली जाते. त्या सभेत गेरिया नेमतात. गेरिया म्हणजे गावातील उपवर तरुण. गेरियाकडे पूर्ण होळीची जबाबदारी असते. बंजारा समाजात धुंड अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो. यात लहान मुलांचे औक्षण केले जाते. त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. एका मोठ्या लाकडाच्या माध्यमातून त्याच लाकडावर बारीक लाकडाने दांडिया वाजवून गाणी म्हटली जातात.
अन् भाई रे रमतेन कुदते रेघे गे ओतेर र..
अन् भाई रे आयेन हुबेच रे एके
नायकेर दरबारी यो र..! उठ पिया सासरे,
हो पळके वार आवे,
जात गोत देखळ आवे बेठो ससरो चरल शिखावे बेठी सासू पाव दबावे,
ओरो झक्कड तार न भावे..!
ज्यांच्याकडे धुंड हा कार्यक्रम असते त्या ठिकाणी त्यांचे सगळेच नातेवाईक त्यांच्याकडे येतात. त्यानंतर गेरिया आणि दांडिया या तरुण मुलांना सुवाळी म्हणजेच शिरा आणि पुरीचे जेवण दिले जाते. धूलिवंदनच्या दिवशी बंजारा समाजातील लोक जंगलातील पळसाची फुलं घरी आणून त्वयाचा रंग तयार करतात. त्याच रंगाने होळी खेळतात. बंजारा समाजातील स्त्रिया गाणे म्हणून दिराकडे पैशाची मागणी करतात. अशाप्रकारे नाती जपत उत्साहाने होळी साजरी केली जाते.
भिवापूर, जि. नागपूर
मो. ९७६५९५०१४४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.