धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

Hospital mistakenly replaced corona mortal remains in nagpur
Hospital mistakenly replaced corona mortal remains in nagpur
Updated on

नागपूर : अखेरच्या क्षणी चेहरा बघण्यासाठी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाचा चेहरा उघडताच पुरुषाऐवजी महिलेचे पार्थिव दिसल्याने शोकाकूल कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. वानाडोंगरी येथील हॉस्पिटलने कोरोनाबळींचे मृतदेह बदलून शोकमग्न कुटुंबाचीच थट्टा केल्याच्या प्रकारामुळे गंगाबाई घाटावर चांगलाच तणाव निर्माण झाला. 

संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाविरोधात कोतवाली पोलिसांत तक्रार केली. मृतदेह योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर वातावरण शांत झाले तरी यानिमित्त कोरोनाच्या गंभीर स्थितीत हॉस्पिटल व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

व्यंकटेश कॉलनी, नंदनवन येथील ६३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांना वानाडोंगरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाले. कोरोनामुळे निधन झाल्यामुळे पार्थिव घरी न पाठवता ॲम्बुलन्सने थेट गंगाबाई घाट येथे येणार असल्याने मोजकेच नातेवाईक आले होते. 

हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिलेली ॲम्बुलन्स काही वेळातच गंगाबाई घाटावर पोहोचली. मृतदेह पोहोचताच आप्तांनी हंबरडा फोडला. उपस्थित नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे एकदा चेहरा बघण्याची विनंती केली. मात्र, मृतदेहाच्या चेहऱ्यावरून प्लॅस्टिक उघडताच घरातील व्यक्तीऐवजी अनोळखी महिलेचा मृतदेह बघून नातेवाइकांच्या शोकाचे रूपांतर संतापात झाले. 

हॉस्पिटल प्रशासनाने कबूल केली चूक

मृत व्यक्तीचे नातेवाईक असलेले माजी नगरसेवक प्रेमलाल भांदककर चांगलेच संतापले. त्यामुळे गंगाबाई घाट येथे तणाव निर्माण झाला. काहींनी तणावाची माहिती दिल्यामुळे पोलिसही पोहोचले. भांदककर यांनी हॉस्पिटल प्रशासनावर तोंडसुख घेत झालेला प्रकार सांगितला. हॉस्पिटल प्रशासनाने चूक कबूल केली. यानंतर महिलेचा मृतदेह मोक्षधाम घाट येथे पाठवला तर मोक्षधाम घाट येथे नेण्यात आलेले पार्थिव गंगाबाई घाट येथे आणण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

असे बदलले मृतदेह

प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या महिलेच्या मृतदेहावर ६३ वर्षीय पुरुषाच्या नावाची कागदी पट्टी चिकटविण्यात आली होती, असे माजी नगरसेवक प्रेमलाल भांदककर यांनी सांगितले. भांदककर यांच्या नातेवाईकाच्या मृतदेहावर महिलेच्या नावाची पट्टी असल्याने ते पार्थिव मोक्षधाम घाट येथे पोहोचले. प्रशासनाकडून झालेल्या चुकीमुळे दोन शोकाकूल कुटुंबांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

या आधीही अशीच घटना

काल, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास गंगाबाई घाटावर मृतदेहाचा चेहरा दाखवण्याची विनंती करणाऱ्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनपा कर्मचारी महेंद्र भोयर यांनी ॲम्बुलन्समधून मृतदेह अंतिम संस्कारासाठी गंगाबाई घाट येथे आणला. नातेवाइकांनी शेवटच्या क्षणी मृतदेहाचा चेहरा दाखवण्याची विनंती केली. भोयर यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे नातेवाइकांनी भोयर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी भोयर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.