नागपूर : ``नौ से बारा साल उमर के एक ऊॅंट (Camel) को क्विंटलभर खाना लगता है. गौशाला में डालनेवाला कुटार तो ऊॅंट खाता नही. तीन बखत पानी पिलाना पडता है. कमसे कम तीस लिटर. गौशाला में ये सब मिलता है क्या? ५८ ऊॅंटो को जल्दी नही छोडा तो मरना तय है. फिर मेनका गांधी (Maneka Gandhi) आएंगी क्या मुआबजा देनेको?``
मेंढीपालक पर्बतभाई रब्बारी (Parbatbhai Rabbari) चांगलेच संतापले. तस्करीच्या नावावर पकडलेल्या उंटांची सुटका करण्याबाबत गुरुवारी काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे रब्बारी समाजाचे सारे मेंढीपालक चिंताग्रस्त झाले. `सकाळ`जवळ त्यांनी खदखद व्यक्त केली.
गुजरात आणि राजस्थानमधील मेंढीपालक रब्बारी समुदाय पिढ्यानपिढ्या उंटांचा वापर करतात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी अनेक रब्बारी कुटुंबे स्थलांतरित होऊन मेंढीच्या चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रात आले. पर्बतभाई रब्बारी हे त्यातील तिसऱ्या पिढीचे. ते विदर्भात स्थायिक झाले. `सकाळ`च्या मदतीने ते गेली काही वर्षे सामाजिक सुधारणा करण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी धडपडत आहेत.
`उंटांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते`, असे त्यांनी सांगितले. ``पकडलेल्या ५८ उंटांमध्ये चार वर्षे वयापासून उंट आहेत. चार वर्षांच्या उंटालाही किमान अर्धा क्विंटल खाद्य रोज हवे असते. विशेष म्हणजे हे भटकंती करणारे उंट आहेत. उंच झाडपाला खाण्यासाठी नैसर्गिक शरीररचनाही तशीच असते. मान उंच करून ते झाडपत्ती खातात. दोन-तीन दिवसानंतर बाजऱ्याच्या आट्यासोबत आंबेहळद वाटून त्यांना खुराक द्यावा लागतो. त्यामुळे त्यांची पचनशक्ती उत्तम राहते. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत त्यांना आम्ही शिवारात घेऊन फिरतो. दिवसभर फिरल्यानंतर त्यांचे पोट भरते. साठवून ठेवलेले पाणी पिण्याची त्यांना सवय नसते. स्वच्छ पाणी पितात. तडकाफडकी निर्णय घेऊन ते त्यांच्या मालकांच्या सुपूर्द केले पाहिजे. हवे असल्यास पोलिसांनी त्यांच्या देखरेखीत पोहोचवून द्यावे. त्यावरून ते कत्तलीसाठी नेत नसल्याचे सिद्ध होईल. गोशाळेत उंट मेले तर नुकसानभरपाई मिळेल का``, असा सवाल पर्बतभाई रब्बारी यांनी केला. साजन करना, जखरा सखू, नागदी सामदा, काला भाडा, मंगा करना, ओसा जेसा, वेरसी वक्का, साजन देवसी, राजा मम्मू, करसन राना, प्रभू राना, हामत विरा, काना भिखा, धना भिमा, विसा सखू, वेरसी राना आदी रब्बारी मेंढीपालकांनीही अशीच चिंता व्यक्त केली.
उंट महाराष्ट्र आणि दिल्लीत मिळतात का?
राजस्थानचे रब्बारी समाजाचे कार्यकर्ते अशोक देवासी यांनी मेनका गांधी यांना फोनवरून याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी उलट शिव्या हासडल्याची माहिती पर्बतभाईंनी दिली. हे सांगत असताना पर्बतभाई पुन्हा संतापले. ``महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये रब्बारी राहतात, हे मेनका गांधीना माहित नाही का? आम्ही उंटाचा वापर करतो, हेही माहित नाही का? मग उंट कुठे पैदा करायचे? मादी उंटांचा वापर आम्ही करत नाही. नर वापरतो. पकडलेल्या ५८ मध्ये सर्वच नर आहेत. आम्हाला आमच्या गरजेसाठी गुजरातवरूनच उंट मागवावे लागतील ना? की दिल्लीवरून आणावे? मेनका गांधींनी ते तरी सांगावे. आम्ही उंट खरंच वापरतो की नाही, ते बघून घ्यावे.``
उंट तस्करीसाठी नेत नसल्याचे सहज शोधता येईल. संबंधित मालकांना विचारले तरीही सत्य बाहेर येईल. परंतु त्यासाठी उंटांना वेठीस धरणे अयोग्य आहे. गोशाळेतून त्यांची तातडीने सुटका केली तरच ते वाचतील. तक्रार करणाऱ्याच्या घरी उंट असते तर त्यांना कळले असते.
-पर्बतभाऊ रब्बारी, मेंढीपालक आणि रब्बारी समाजाचे कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.