नागपूर : आधुनिक जीवनशैली, बदललेली दिनचर्या, फास्ट फूड या सगळ्यांमुळे महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना थांबविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे हा एकमेव उपाय असल्याचे मत स्त्रिरोगतज्ञ डॉ.
सायली चाफले रोटकर यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासह अभिषेक वसंत रोटकर उपस्थित होते. साधारणतः स्त्रियांमध्ये पीसीओडी, पीसीओएस, स्तनांचा कर्करोग, फायब्रोडेनोमा आणि रजोनिवृत्ती (मोनोपॉज) यांसाख्या आजारांच्या तक्रारी अधिक असतात.
याशिवाय स्त्रियांना अलीकडील काळात लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अॅनिमिया, मधुमेह, थायरॉइडची कमतरता, गर्भाशयाच्या किंवा स्तनांच्या गाठी, मानसिक आजार अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते आहे. यासाठी आहार आणि व्यायामासह योग्य जीवनशैलीचा योग साधण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सायली चाफले रोटकर यांनी दिला.
महिलांच्या अनियमित मासिक पाळीमुळे लठ्ठपणा, गळ्यावर काळे डाग, शरीरातील कोणत्याही भागात केसं येणे, चेहऱ्यावर पिंपल्स आणि केस गळणे अशा अनेक तक्रारी असतात. ही सर्व लक्षणे पीसीओडीची असल्याचे डॉ. सायली यांनी सांगितले.
दरम्यान पीसीओएस हा पीसीओडी पेक्षा वेगळा असून यात एकापेक्षा अनेक लक्षणे दिसून येत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती विषयी देखील माहिती दिली. थोडक्यात बाईची पाळी थांबते त्याला मेनोपॉज म्हणतात. यादरम्यान स्त्रियांची अनियमित होणारी मासिक पाळी तसेच त्याचे परिणाम याविषयांवर मार्गदर्शन केले.
स्त्रियांमध्ये वाढणाऱ्या स्तनांच्या कर्करोगावर ही त्यांनी चर्चा केली. यावेळी स्तनाच्या कर्करोगाविषयी स्त्रियांमध्ये जनजागृती नसल्याचे त्या म्हणाल्या. स्तनाच्या कर्करोग हा मजबूत कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना जनुकामध्ये उत्परिवर्तन वारशाने मिळालेले असू शकतो. त्यामुळे ज्यांच्या कुटुंबातील सदस्याला पूर्वी कॅन्सर झाला अशा घरातील महिलांनी स्वत:च्या शरीराचे कायम परिक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. सायली यांनी स्तनांमध्ये येणारी प्रत्येक गाठ कर्करोगाची नसल्याची नसून काही गाठी साध्या असल्याचे सांगितले. या गाठींना ‘फायब्रोडेनोमा’ असे म्हणतात. डॉक्टरांच्या मते, सहसा मध्यम वयात या गाठी येतात.आकाराने हळूहळू वाढणाऱ्या या गाठी वेदनादायी असू शकतात.
मात्र स्तनामध्ये ही गाठ साधी आहे वा कर्करोगाची हे ठरवणे अवघड असते. त्यामुळे अशावेळी ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याची माहिती डॉ. सायली यांनी दिली. यावेळी त्यांनी भारतात महिलांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मार्गदर्शन केले.
ह्युमन पॅपिलोम व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे पसरणारा हा आजार असून यावर लस देखील उपलब्ध आहे. मात्र भारतातील महिलांमध्ये या कॅन्सरबद्दल जनजागृती झाली नसल्याने या लशीची देखील जनजागृती झाली नसल्याचे डॉ. सायली यांनी सांगितले.
कोणती काळजी घ्याल ?
प्रत्येक स्त्रीने टप्प्याटप्प्यावर शरीराची योग्य तपासणी करून घ्यावी. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्त्रियांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. शारीरिक बदल, पाळीचा कालावधी, बाळंतपणाचा काळ, स्तनपानाचा काळ, रजोनिवत्तीनंतरचे आजार या टप्प्यांवर आरोग्याकडे विशेष लक्ष हवे. तसेच महिलांनी त्यांना होणाऱ्या वेदना आणि आजार याविषयी मोकळेपणाने बोलणे गरजेचे असल्याचे मत स्त्रिरोगतज्ञ डॉ. सायली चाफले रोटकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.