नागपूर : करचोरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने वर्धमान नगरातील एका कोळसा व्यावसायिकांच्या समूहावर आज छापा मारला. सकाळी नागपूर येथील निवासस्थानासह दहा ठिकाणी तसेच चंद्रपूर आणि झारखंड राज्यातील कार्यालयांवरही छापे टाकले. त्यातील काही ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तवेज, रोख रक्कम व दागिने सापडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे कोळसा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह झारखंड येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने नागपूरच्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई केली. या संयुक्त पथकामध्ये जवळपास १०० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत. पथकाने शहरातील वर्धमाननगर,
सिव्हिल लाइन्स, गोकुलपेठ आणि पार्डी नाका यासह चंद्रपूर आणि झारखंडमधील कार्यालये व निवासस्थानी छापे टाकले. सकाळी आठ वाजता कारवाईस सुरुवात झाली. कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात येत आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छापेमारीत आढळलेली कागदपत्रे जप्त करण्यात येत असून त्याची पडताळणीही करण्यात येत आहे. संगीता सेल्सच्या माध्यमातून संचालक अंदाजे ५०० कोटीची उलाढाल करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कंपनीचे एक कार्यालय झारखंडमध्ये असल्याने तेथेही कारवाई केली जात आहे.
कंपनीची स्थापना १९९२ साली झालेली आहे. संगीता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड ही स्टीम कोळसा, रॉम कोळसा, स्लॅक कोळसा इत्यादींचा व्यापार आणि पुरवठा करीत असते. हा व्यवसाय करीत असताना कोट्यवधी रुपयांच्या कराची चोरी केल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली.
त्या माहितीच्या आधारे विभागाने तपासणी केली असता त्यांनी कराची चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती पुढे आली आहे. विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
त्यातील काही कार्यालयातील कारवाई संपली असून त्यात विविध संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे आणि संगणकातील माहिती ताब्यात घेतली आहे. या कंपनीचे संचालक ए. के. अग्रवाल आहे. कोळशासह वेअरहाऊसचा व्यवसायही कंपनी करीत असल्याची माहिती पुढे आलेली आहे.
आजही कारवाई सुरू राहणार
विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी लेखाजोखाशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. ही कारवाई अजून दोन दिवस चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.