छे "हे' संस्थात्मक विलगीकरण नव्हे, ही तर अंधारकोठडी ! वाचा कशी....

आरंभी ः ज्या शाळेत तीन व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणच्या दुरवस्थेचे चित्र.
आरंभी ः ज्या शाळेत तीन व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणच्या दुरवस्थेचे चित्र.
Updated on

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील दुर्गम भागात असलेल्या आरंभी या गावात काही जण कामानिमित्त एका दिवसासाठी बाहेरगावी जाऊन आले. ही माहिती ग्रामपंचायतीला कळल्यानंतर त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविले. अधिकाऱ्यांनी सर्वांनाच घरीच विलगीकरण करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यानंतरही ग्रामपंचायतीने सर्वच नियम धाब्यावर बसून त्यांना गावातील शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्याचा अफलातून प्रकार आरंभी येथे घडला.

आदेश नसतानाही घेतला निर्णय
सध्या सर्वत्र कोरोनाची भीती पसरली आहे. यात गावखेडेही मागे नाहीत. सर्वच गाव स्वतःची सुरक्षा करण्यात व्यस्त आहेत. हे करीत असताना काही ग्रामपंचायती कोविडअंतर्गत असलेल्या शासनाच्या सर्व नियमांना तिलांजली देऊन मनमानी कारभार करीत आहे. याचाच प्रत्यय नरखेड तालुक्‍यातील आरंभी या गावात आला. या गावात एक व्यक्ती राजस्थान येथून आली व आधीच तो 14 दिवस विलगीकरनाचा कालावधी करून आला होता. तसे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे. तरी त्याला संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले.

ना वीज, ना पाणी, ना पंखा
गावातील एक महिला, तिचा मुलगा व पुतण्या हे रविवारी (ता. 10) काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते सोमवारी (ता. 11) गावात आले व त्यांना ग्रामपंचायत यांनी मेंढला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून 14 दिवस घरी विलगीकरण करण्याचे आदेश दिले. हे तिघे जण घरी गेल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दाखविले. तरीही त्यांना संस्थात्मक विलगीकरण करीत त्यांना गावातील एका शाळेतच ठेवले. हे करीत असताना त्या शाळेत ना पाणी, ना जेवण, ना वीज, ना सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली.

मार्गदर्शक सूचनांना केराची टोपली
संस्थात्मक विलगीकरण करताना शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या. पण, याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर या सर्वांना घरूनच जेवण, नाश्‍ता व चहा देण्यास सांगण्यात आले. असे जर असेल, तर हे खरेच संस्थात्मक विलगीकरण होय का? तसेच याची सूचनादेखील कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. तसेच विलगीकरण करण्यात आलेल्यांमध्ये एक 17 वर्षीय सिकलसेल आजार असलेला रुग्णदेखील आहे, हे विशेष.

संस्थांत्मक विलगीकरणाचा अधिकार नाही
बाहेरगावाहून आलेल्या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली. पण, त्यांच्या कोविड आजाराचे लक्षण मिळाले नाही. तरी खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणालाही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले नाही. नरखेडचे तहसीलदार हरीश गाडे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबत सर्व माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेण्याचे सांगितले.
-डॉ. घोलपे
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्यकेंद्र, मेंढला

कारवाई करण्यात येईल
तालुक्‍यात सध्या कोणालाच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले नाही. तसेच आरंभी येथेही कोणालाही संस्थात्मक विलगीकरण करण्याचे आदेश नसताना ग्रामपंचायतने केल्याची माहिती नाही. हे कसे करण्यात आले व का केले, याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
-डॉ. विद्यानंद गायकवाड
तालुका वैद्यकीय अधिकारी

हो आम्ही निर्णय घेतला
एक तरुण हा स्वतः संस्थात्मक विलगीकरणात राहायला तयार होता. म्हणून त्याचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. तसेच तीन जण हे बाहेरगावाहून आले होते. त्यांनाही संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.
-नरेश गोरे
सरपंच, आरंभी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.