नागपूर : नियमित सायकल चालविल्याने शारीरिक तंदुरुस्तीसह ‘स्टॅमिना’ही वाढतो. ‘सायकलिंग’मुळे मिळणाऱ्या ऊर्जेमुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. शिवाय प्रदूषण कमी होऊन पर्यावरणास हातभार लागतो. नागपूरकरांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक उपयोग केल्यास ‘सायकल कल्चर’ निर्माण होऊन ‘स्मार्ट सिटी’स हातभार लागू शकतो. त्यासाठी पायाभूत सुविधांसोबतच जनजागृती आवश्यक असल्याचे मत सायकलप्रेमींनी व्यक्त केले आहे. (Cycling-brings-stamina-along-with-physical-fitness!)
‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत सिमेंटचे चकाचक रस्ते झाले. उड्डाणपूल बनले. मेट्रोही धावू लागली. मात्र, खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर व स्वस्थ ‘स्मार्ट सिटी’साठी आवश्यक असलेले ‘सायकल कल्चर’ अद्याप विकसित झालेले नाही. त्यासाठी मनपा प्रशासनाला पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी सांगितले.
जनजागृती करून जास्तीतजास्त लोकांना ‘सायकलिंग’साठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यासाठी नियम, कायदे किंवा निश्चित धोरण आखावे लागेल. सोबतच पायाभूत सुविधांचाही विकास करावा लागेल. तसेच शहरात जागोजागी सायकल ट्रॅक व स्टॅण्ड उभारावे लागतील. प्रशासनाने मनावर घेतले तरच हे सहज शक्य आहे. घराघरांत सायकलचा वापर वाढल्यास नागपूरकर फिट राहून ‘सायकल कल्चर’ निर्माण होईल. पर्यायाने प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागेल, असेही डॉ. अमित समर्थ म्हणाले.
छोट्या कामांसाठी सायकल वापरा
शहरात छोट्या-छोट्या कामांसाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहने वापरण्याचे चलन मोठ्या प्रमाणावर आहे. नागपूरकरांना त्यांची ही सवय बदलविण्याची गरज आहे. घराजवळ दूध, भाजी, किराणा किंवा सलूनवाल्यांकडे जाताना वाहनांऐवजी सायकलचाच वापर करायला हवा. लांब जायचे असेल तरच वाहनांचा उपयोग करावा, असेही डॉ. समर्थ म्हणाले.
‘सायकलिंग’ अनिवार्य करा
नागपुरात सायकल चालविणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वयोगटावर फोकस करण्याची गरज आहे. शाळा व महाविद्यालयीन मुलांना ‘सायकलिंग’साठी प्रोत्साहन दिल्यास खूप फरक पडू शकतो. शिवाय सरकारी व खासगी कार्यालयांमध्येही आठवड्यातून किमान दोन दिवस सायकल वापरणे अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसार करण्याची सूचना डॉ. समर्थ यांनी केली.
काय करायला हवे
मनपा प्रशासनातर्फे जनजागृती हवी
नियम, कायदे व निश्चित धोरण आवश्यक
शहरात जागोजागी स्वतंत्र लेन किंवा सायकल ट्रॅक
शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये सायकलचा वापर अनिवार्य
कार्यालयांमध्येही सायकलचा वापर बंधनकारक
जवळच्या कामांसाठी वाहनांऐवजी सायकलचा वापर
इच्छाशक्तीची गरज, प्रोत्साहन मिळावे
सोशल मीडियावर प्रचार व प्रसार
(Cycling-brings-stamina-along-with-physical-fitness!)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.