Dr. Mohan Bhagwat : भारतालाही बांगलादेश बनवण्याचा कट : डॉ. भागवत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

Dr. Mohan Bhagwat : नागपूरमध्ये विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा कट उलगडला. समाजातील विषमता दूर करून संघटित हिंदू समाजाची आवश्यकता व्यक्त केली.
 Dr. Mohan Bhagwat
Dr. Mohan Bhagwatsakal
Updated on

नागपूर : भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा कट आंतरराष्ट्रीय पातळीवर रचला जाता आहे. सांस्कृतिक मार्क्सवादाच्या माध्यमातून ते केले जात आहे. शेजारच्या देशात ते दिसून आले आहे. तेथे ‘भारत हा आपल्यासाठी धोका आहे.’ असे खोटे पसरवले जात आहे. भारतातही बांगला देश करण्याचा प्रयत्न या कटाचा एक भाग आहे.

तो कट हाणून पाडायचा असेल तर, आपल्यातली विषमता, जातीयता दूर करून संघटित, समरस हिंदू समाज तयार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शनिवारी शहरातील रेशीमबाग मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांच्यासह प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांचीही उपस्थिती होती.

इस्राईल आणि हमास युद्धावर बोलताना सरसंघचालक म्हणाले, परिस्थिती कधी आव्हानात्मक असते तर कधी चांगली. मानवी जीवन भौतिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध झाले आहे. परंतु, या आनंदी आणि विकसित मानवी समाजात अनेक संघर्ष सुरू आहेत. इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू झालेले युद्ध किती व्यापक होईल आणि त्याचा इतरांवर काय परिणाम होईल याची चिंता सर्वांनाच आहे.

मूल्यांच्या ऱ्हासाचा परिणाम म्हणजे देशातील मातृशक्ती बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जात आहे. कोलकत्याची घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणारी घटना आहे. आंदोलक डॉक्टरांच्या पाठीशी समाज उभा राहिला. मात्र, काही लोक गुन्हेगारांना अभय देत आहेत. गुन्हेगारी, राजकारण आणि वाईट संस्कृतीचे हे बंधन आपल्याला बिघडवत आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय राजेश लोया यांनी करून दिला. उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.

संघाचे शताब्दी वर्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाच्या विजयादशमीला शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराणी दुर्गावती, महाराणी होळकर आणि महर्षी दयानंद यांचे २०० वी जयंती वर्षही सुरू आहे. त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे कारण या लोकांनी देश, समाज आणि संस्कृतीच्या हिताचे काम केले आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.

औद्योगिक क्रांतीबाबत आशावादी : डॉ. के. राधाकृष्णन

भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम सामाजिक स्वरूपाचा असून, शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिक कोळ्यांच्या जीवनातही त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. सातव्या औद्योगिक क्रांतीविषयी आम्ही आशादायी असलो तरी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा हवा. ते मानवी जीवनात कसा बदल घडवून आणू शकेल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

भगवतगीता आपल्याला निर्भिडता, बलिदान, सत्यनिष्ठता, स्वाध्याय आदि मूल्ये आत्मसात करण्यासाठी मदत करते. गीतेतील संदेशानुसार धनुर्धारी अर्जुन आणि योगेश्वर कृष्ण दोघेही विजयासाठी आवश्यक आहेत. त्यासाठी आम्हाला शस्त्रांची जशी गरज आहे तशीच नैतिक मूल्यांचीही गरज आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.