नागपूर ः सुखाची झोप सर्वांनाच हवी आहे; परंतु आज जीवन धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आणि निसर्गदत्त देणगी असलेली झोप उडाली. सोशल मिडियावरील व्हॉटस्ॲप,फेसबुकमुळे तसेच मानवी स्वभावातील महत्त्वाकांक्षा ‘झेप' घेत असताना झोपेला नजर लागली. झोपेच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. निसर्गदत्त देणगी असलेली झोप रोग प्रतिकार शक्ती वाढवत असल्याने कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचे बळ याच सुखाच्या झोपेतून मिळते, असा दावा स्लीप मेडिसीन विषयात ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी’ तून पदवी पूर्ण करणारे तसेच मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी आज येथे केला.
झोपेचे आजार १०० प्रकारचे आहेत. यात ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत, हे विशेष. आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात घालवतात. शहरीकरण, औद्योगिकीकरणासोबतच माहिती तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या सोशल नेटवर्किंगने चिमुकल्या पासून तर साठीतील जेष्ठांच्या झोपेवर अतिक्रमण केले. मेंदू झोपेत जागा राहण्याचे, मोबाईल फोबियासह झोपेत श्वास थांबणे, झोपेत फिट येणे, काही काळासाठी स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा, दिवसा थकल्यासारखे वाटणे, झोपेतून उठताना थकवा जाणवणे, झोपेत लघवी करणे आदी झोपेचे आजार आहेत.
अलीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अपुऱ्या झोपेमुळे विषाणूचा प्रभाव मानवावर अधिक जाणवत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. विषाणू सुक्ष्मजीव असतात. त्यांच्या डीएनए आणि आरएनएचे प्रकार असतात पण ते पुनरुत्पादन करू शकत नाहीत. त्यामुळे असे विषाणू हे त्यांच्या पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या जिवांवर अवलंबून असतात. विषाणू व्यक्तींच्या ज्या पेशींमध्ये संक्रमण करतात, ती पेशी विषाणूंच्या पुनरुत्पादनामुळे नष्ट होतात.
विषाणू संक्रमित पेशीत बदल झाला नाही तर त्या व्यक्तीवर विषाणूंच्या संसर्गाचा परिणाम होत नाही. परिणामी तो आजारी पडत नाही. मात्र, संक्रमित पेशी नष्ट होत असतील तर व्यक्ती गंभीर आजारी होते. हाच प्रकार कोरोना विषाणूच्या संदर्भात सुरू आहे, असे मत डॉ. सुशांत मेश्राम यांनी व्यक्त केले.
सुखाच्या झोपेचे तंत्र
चांगली झोप येण्याचे तंत्र आहे. झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितींमधून प्रवास करतो. चारही झोपेच्या स्थितींमध्ये डोळ्यांची हालचाल न होता घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला "नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप' असे संबोधले जाते. डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. अशाप्रकारे झोपेचे एक चक्र सुमारे ९० मिनिटांचे असते. असे चार चक्र असतात. या चक्रांची दिशा योग्य असली तर झोपेनंतर मनुष्य शांत असतो. चिडचिड होत नाही. झोपेतील चक्रात वारंवार बदल आले की, बॉयोलॉजिकल क्लॉक बिघडते आणि आजाराला निमंत्रण मिळते.
कोरोना विषाणू सोबत लढण्यासाठी टीएच-२ प्रकारची सैनिक पेशी महत्वाची असते. ही पेशी विषाणूची वाढ होऊ देत नाही. जी व्यक्ती संतुलित आहार, विहार (व्यायाम) करतात. तसेच विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी झोप घेतात, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यातूनच कोरोनासारख्या विषाणूंशी लढण्याचे बळ मिळते.
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख,
श्वसनरोग विभागप्रमुख, मेडिकल व सुपर स्पेशालिटी, नागपूर.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.