नागपूर : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, त्यांना कमी खर्चात विना व्यत्यय अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचवावे, या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली.
पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांना महावितरणच्या वेबपोर्टलवर लिंकही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र या लिंकमधून क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या विधानसभा क्षेत्रातील सावनेर आणि कळमेश्वर हे दोन्ही महत्त्वाचे तालुके गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील हजारो शेतकऱ्यांवर सौर कृषिपंपापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
ओलितीची शेती करताना अनेकवेळा दिवसा वीज राहात नाही किंवा त्यात वारंवार व्यत्यय येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली. पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात साडे सात अश्वशक्तीच्या आणखी ७५ हजार नवीन पंपासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतीच मंजुरी प्रदान केली.
ही योजना महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. महावितरणच्या विशेष वेबपोर्टलवरील लिंकवर ऑनलाइन अर्ज भरताना इच्छुक शेतकऱ्यांना आपली संपूर्ण माहिती द्यावयाची आहे. जिल्ह्याचे नाव टाकल्यानंतर दुसरा कॉलम तालुक्यांचा आहे. मात्र यात नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि कळमेश्वर हे दोन्ही तालुके गायब आहेत. उल्लेखनीय म्हणजे हे दोन्ही तालुके दुग्ध, पशू संवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांचे आहेत.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत. चांगल्या योजनेपासून वंचित राहण्याची त्यांच्यावर वेळ येऊ शकते. सावनेर आणि कळमेश्वरमध्ये हजारो गोरगरीब शेतकरी आहेत. मात्र नियमित वीज पुरावठ्याअभावी सिंचन करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सौर कृषिपंप मिळाल्यास त्यांना दिवसा विनाव्यतय अखंडित वीजपुरवठा तर उपलब्ध होईलच, शिवाय भरमसाठ वीज बिलापासून मुक्तताही मिळणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे पर्यावरणासाठीही सौर पंप लाभदायक ठरणार आहेत. या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळावा, असे शासनाचे धोरण असले तरी, सावनेर आणि कळमेश्वरमधील शेतकऱ्यांवर मात्र फार मोठा अन्याय होणार आहे.
याविषयी माझ्याकडे पुरेशी माहिती नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतरच मी बोलू शकेन.
ना. सुनील केदार
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.