Labor Day Special : संघर्ष रोजच्या रोटीसाठी, भविष्याचे काय? - हरीश धुरट

सामाजिक सुरक्षेच्या नावे बोंब; कसे येणार कामगार मुख्य प्रवाहात?
Labor Day Special
Labor Day Specialsakal
Updated on

नागपूर - कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याकडे जातीने लक्ष देऊन त्यांच्या उद्धाराचा खऱ्या अर्थाने विचार झाला तरच ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, अन्यथा पिढ्यान् पिढ्यांपासून त्यांचा फक्त आणि फक्त वापर होत राहणार, असे स्पष्ट आणि परखड मत राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीचे विदर्भ अध्यक्ष डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केले.

डॉ. धुरट कृषी उत्पन्न बाजार समिती, मालधक्का, शासकीय व निमशासकीय गोदामे, सार्वजनिक वाहतूक, जेथे हमालीचे काम चालतात असे कारखाने आदी क्षेत्रात हमाल व माथाडी कामगारांसाठी १९८७ पासून कार्यरत आहेत. असंघटित, असुरक्षित व अंगमेहनत करणाऱ्यांना माणूस म्हणून जगावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

धुरट म्हणाले, श्रमिकांचा संघर्ष केवळ दोन वेळच्या जेवणासाठी असतो. एवढ्यापुरते जगून खरेच त्यांचे आयुष्य सुखकर होईल का, हा प्रश्न आहे. जोपर्यंत हात चालतात, तोपर्यंत ठीक; परंतु उद्या हाता-पायाने साथ सोडली तर उपाशी मरण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुरक्षा, स्थैर्य याशिवाय कायद्यानुसार त्यांच्या भविष्याची तरतूद होणे गरजेचे आहे.

मोलकरणींच्या भविष्यासाठी हवी तरतूद

एक मोलकरीण एका दिवशी चार ते पाच घरी काम करते. यातून तिला जी मिळकत येते यावर तिची गुजराण होते. परंतु हे सारे जोपर्यंत तिचे हातपाय चालतात तोपर्यंत शक्य होते. पुढे ज्या काळात तिला आधाराची गरज आहे, अशा दिवसांत तिच्या संघर्षाला पारावार नसतो.

त्यामुळे माथाडी कामगारांसाठी जसे कायदे आहेत त्याच धर्तीवर मोलकरीण महिलांसाठी कायदे होणे गरजेचे आहे. त्यांच्या मिळकतीमधील काही हिस्सा भविष्याच्या तरतुदीसाठी असलाच पाहिजे. तसे झाले नाही समाजातील एक वर्ग दारिद्र्यात खितपत राहील.

नवकामगारांचेही शोषण

कामगारांच्या शोषणाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मोठे कंत्राटदार उपकंत्राटदार नेमून त्यांच्याद्वारे काम करून घेतात. अनेक ठिकाणी कामगारांचा प्रॉव्हिटंड फंड भरलाच जात नाही. मॉलमध्ये काम करणारे, खाद्यअन्न पुरविणारे यांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर राबवले जाते.

कमिशनचे गाजर दाखवून त्यांचे एकप्रकारे शोषणच केले जाते. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात या वर्गाची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही करायचे असेल तर त्यांची सामाजिक, आर्थिक प्रगती होणे गरजेचे आहे, असेही धुरट यांनी सांगितले.

कामगारांचे तीन वर्ग

  • पहिला कर्मचारी वर्ग ज्यात शासकीय आणि इतर कामगार याशिवाय कंत्राटी कामगारांचा समावेश होतो.

  • दुसरे म्हणजे कारखान्यात काम करणारे कामगार

  • तिसरे म्हणजे कष्टकरी वर्ग. यात ठिय्या कामगार, हमाल, मिळेल ते काम करणारे अशा साऱ्यांचा समावेश होतो.

असंघटित कामगारांचे ६६ प्रकार

  • सरकारने केलेल्या एका सर्व्हेत असंघटित कामगारांचे ६६ प्रकार सांगितले आहेत.

  • या कामगारांमध्ये सेक्युरिटी गार्ड, बांधकाम मजूर, कंत्राटी कामगार आणि मोलकरीण यांचा समावेश होतो. मुळात या कष्टकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच तरतूद नाही.

१२ तासांविरुद्ध आमचा लढा

२०१४ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्याची तरतूद करण्यात आली. त्यासाठी वर्मा कमिशनची नियुक्ती करण्यात आली, पुढे त्याचे काहीच झाले नाही. कामगारांचे कामाचे तास १२ व्हावे, याबाबत केंद्राने कायदा केला आहे, याविरोधात आमचा लढा सुरू आहे.

बालकामगार : कारवाई व्हावी

बालकामगारांचे प्रश्न अधिक बिकट आहेत. बालकांना राबविणे हा गुन्हा असला तरी आजही वीटभट्ट्या आणि इतर अनेक ठिकाणी पालकांसोबत बालमजूर राबत आहेत. कारवाई झाल्यास थातूरमातूर कारणे, सबबी देऊन वेळ मारून नेली जाते, ही वास्तविकता धुरट यांनी लक्षात आणून दिली.

महिला कामगार म्‍हणतात...

पुढे हात चालले नाही तर मग?

मी स्वयंपाकाचे काम करून आपले आणि कुटुंबाचे पालनपोषण करते. सध्या मी जेवढे कमावते तेवढ्या पैशात घर चालते. पोरांच्या शिक्षणाचा सध्या खर्च नाही. परंतु उद्या त्यांच्या शिक्षणाला पैसे लागेल आणि मी आयुष्यभर एवढे काम करू शकेल का? आज हात चालते म्हणून ठीक आहे, उद्याचे काय? आमच्या भविष्यासाठी काहीतरी उपाययोजना व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.

- वनिता शंभरकर, स्वयंपाक काम करणाऱ्या महिला

कायद्याचा उपयोगच नाही

मी धुणी-भांडी करून घर चालवते. वाढत्या महागाईनुसार पगार कमी आहे. सहा महिने-वर्षातून तरी पगारवाढ झाली पाहिजे. एक दिवस सुटी घेतली तर पगारातून पैसे कपात होते. हे करणे कितपत योग्य आहे. आम्हा कष्टकऱ्यांसाठी काही नियम-कायदे असले पाहिजे. आज घरोघरी दोघेही नोकरीवर असल्याने आमची गरज भासतेच. तेव्हा आमचाही कुठेतरी विचार करून भविष्यासाठी काहीतरी तरतूद व्हावी.

- पूनम घोरपडे, घरेलू कामगार

कामगाराची कविता

मी मजूर, या देशाचा राजा...

मी मजूर या देशाचा राजा

पण किंमत आली नाही माह्या काजा

मी दारिद्र्यातच राहिलो

मी दारिद्र्यातच जगलो

माह्या जन्माचा

माह्या मरणाचा

झाला नाही गाजावाजा

त्यांच्या इमारतीचा पाया माझी हाडं

मला मीठ भाकर ते खाती गोड धोड

त्यांच्या सुखाचा, त्यांच्या दुःखाचा

मीच पेलला बोजा

मी वंचित राहिलो साऱ्या योजनांपासून

ते मजेत जगती घरात कुत्रे पोसून

त्यांच्या दारावर, एका इशाऱ्यावर

राजसत्ता धाडीते पिझ्झा

मी रगत आठवलं अन् गटवलं तुम्ही

अरं माणुसकीला कुठं पाठवलं तुम्ही

माह्या घामाचा, माह्या दामाचा

का? हिशेब केला वजा

या तळहातावर पृथ्वी पेलली नं गा?

मग एक मागतो येवू नका तुम्ही रागा

माह्या मुलांचा, चिल्यापिलांचा

द्या घास, पदरात टाका

संजय गोडघाटे, मो : ९६२३३४५४५२

(संजय घोडघाटे हे कामगारांचे आयुष्य जगतात. कामगारांचा संघर्ष ते काव्यातून मांडतात.)

एवढे व्हावेच

  • ज्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये फूल न फुलाची पाकळी भविष्याची तरतूद केली जाते तशी तरतूद कामगारांच्या भविष्यासाठी असावी.

  • कामगार वेतनासंदर्भात किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी व्हावी.

  • कामाचे तास निश्चित व्हावे. कष्टकऱ्यांना आठ तासांपेक्षा अधिक काम नसावे.

  • महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.