मिरची घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या भिवापुरी मिरचीचे वैशिष्ट; का घटत चालली उत्पादन व लागवड

Learn the features of Bhivapuri Chili
Learn the features of Bhivapuri Chili
Updated on

नागपूर : नागपूर जिल्ह्यात पिकविल्या जाणाऱ्या भिवापुरी मिरचीची ख्याती सर्वत्र आहे. भिवापुरी मिरचीचे कोरडवाहूतही पीक घेतले जाते. तिच्यावर रोगाचा प्रादुर्भावही कमी असतो. या मिरचीची लांबी एक ते दीड इंच व आकार ढोबळ असते. हायब्रिड मिरचीच्या तुलनेत हिचे टर्फल अधिक जाड, लाल व ती कितीही दिवस साठवून ठेवली तरी रंग सोडत नाही. तिचे तिखटही पांढरे होत नाही. हायब्रिडच्या तुलनेत कमी तिखट असून, ती पचनासाठी चांगली आहे. यामुळे ॲसिडिटी होत नाही. ही अँटी कॅन्सर ड्रग म्हणूनही काम करते. ती महाग असली तरी सांधेदुखी व अंगदुखीसाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ‘सी’ व ‘अ’ असे गुणधर्मही असल्याचे भिवापूर तालुक्यातील चिखलापार येथील कृषिभूषण डॉ. नारायण लांबट यांनी सांगितले.

संत्र्याप्रमाणेच विदर्भातील वायगाव हळद व भिवापुरी मिरचीलाही जीआय (भौगोलिक मानांकन) प्राप्त आहेत. परंतु, पारंपरिक पद्धतीने होत असलेली भिवापुरीची लागवड आता शेतकऱ्यांकडून संकरितच्या (हायब्रिड) तुलनेत घटत चालली आहे. भिवापुरी मिरचीचे उत्पादन व लागवड घटली असली तरी तिची मागणी आहेच. त्यामुळे नागपुरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या भिवापुरी मिरचीची ओळख वाचविण्यासोबतच तिचे उत्पादन वाढवून क्वॉलिटी टिकविण्यासाठी संशोधन सुरू आहे.

कृषी विभागाने विद्यापीठाला भिवापुरी मिरचीची लागवड करणाऱ्या भिवापूर, उमरेड, कुही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध करून दिले. त्या बियाणांची कृषी विद्यापीठाच्या बगीच्यामध्ये लागवड करून मिरचीच्या झाडांची निगा राखण्यात येत आहे. या झाडांमध्ये होणाऱ्या बदलांवर सोबतच त्यावर पसरणाऱ्या वायरस, कीड आदींवर लक्ष देण्यात येत आहे.

आज हायब्रिड मिरचीची लागवड व उत्पादन जरी भिवापुरी मिरचीच्या तुलनेत अधिक असले तरी तिची क्वॉलिटी ही भिवापुरीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जपण्यासोबतच भिवापुरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभाग व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये हे संशोधन पूर्णत्वास येणार आहे. हे संशोधन निश्‍चितच यशस्वी होऊन शेतकरी या मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतील, असा विश्‍वास शेंडे यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य जपण्यास होईल मदत
भिवापुरी मिरचीची क्वॉलिटी टिकवून ठेवत तिचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभाग व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांचे अर्थार्जन वाढेल. यामुळे निश्‍चितच ते अधिक उत्पादन देणाऱ्या हायब्रिड मिरचीच्या लागवडीऐवजी जगात मान्यता असलेल्या व विदर्भाची ओळख असलेल्या भिवापुरी मिरचीची लागवड करेल. यामुळे भिवापुरी मिरचीची ओळख कायम राहून नागरिकांनाही चांगली मिरची उपलब्ध होऊन त्यांना त्यांचे आरोग्य जपण्यास मदत होईल.
- मिलिंद शेंडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

शेतकऱ्यांना अधिक अर्थार्जन करण्यासाठी संशोधन सुरू

साधारणत: एक एकरवर भिवापुरी ओल्या मिरचीचे २० क्विंटल उत्पादन होते. तर वाळल्यानंतर ते पाच क्विंटलवर जाते. तर हायब्रिड ओल्या मिरचीचे एकरी ७० ते ८० क्विंटलवर उत्पादन होते. वाळल्यानंतर ते जवळपास २० क्विंटलपर्यंत येते. यामुळे शेतकऱ्यांचा हायब्रिड मिरचीकडे कल वाढला आहे. भिवापुरी मिरचीची लुप्त होत चाललेली ओळख जपण्यासाठी शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर आहे. मिरचीची ओळख कायम ठेवण्यासोबतच क्वॉलिटी टिकवून ठेवीत उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना अधिक अर्थार्जन करण्यासाठी संशोधन सुरू आहे, असे मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.