"मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

corona
corona
Updated on

नागपूर : दिवसेंदिवस नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढत चालली आहे. त्यात मृत्यूंचं प्रमाणही भयावह आहे. संचारबंदीचं उल्लंघन झाल्यामुळे आकडा अधिकच फुगण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतरही नागरिक बिनधास्त रस्त्यांवर फिरताहेत. म्हणूनच मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेल्या एका कोरोनाग्रस्तानं नागपूरकरांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. जाणून घ्या काय लिहिलंय या पत्रात.

हेही वाचा - रुग्णांना दिलासा! नागपुरातील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटमध्ये शंभर बेड्सच्या कोविड रुग्णालयाचं उदघाटन

प्रिय नागपूरकरांनो,

आता तुम्ही म्हणत असाल हा कोण हुश्शार आम्हाला पत्र लिहिणारा? पण मजेशीर गोष्ट अशी की मी अजिबात हुश्शार नाही. मी पण तुमच्यासारखाच एक सामान्य नागपूरकर. सकाळी उठणे, दिनचर्येचे कार्यक्रम आटोपले की कामाला जाणे, मित्रांसोबत फुटाळावर गप्पा मारणे, कधीतरी बर्डीला शॉपिंग करणे असे माझे छंद. डिसेंबर २०२० मध्ये कोरोना गेला आणि मी बिनधास्त रस्त्यांवर फिरू लागलो, रस्त्यावर उभा राहून तर्री पोहा खाऊ लागलो. प्रत्येक लग्नसमारंभांना हजेरी लावू लागलो.

मात्र फेब्रुवारीत कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू लागले आणि माझ्यासारख्या अनेकांची चिंताच वाढली. त्यात गेल्या महिन्यात लॉकडाऊन जाहीर झालं. "आता कसं बे? खर्रा कुठून आनाचा?" असे मित्रांचे फोन येऊ लागले. पण तुम्हाला तर माहितीच आहे. नागपूरकर आहे आपण, कोणालाच नाही जुमानत. लॉकडाऊन असतानाही कोरोनाचे नियम मोडून सर्व काम केले. अगदी घरच्यांचंही न ऐकता. मग काय 'अति तिथं माती' म्हणतात ना तेच झालं.

एका रात्री अचानक थंडी वाजायला सुरुवात झाली. अंग शहारून आलं. ताप चढला. आधी वाटलं काम करून अतिशय दमलो आहे म्हणून झालं असावं. मात्र दुसऱ्या दिवशी सर्दी आणि खोकल्यासह घसाही दुखू लागला. त्यावेळी लक्षात आलं हे काही सामान्य नाही. त्यामुळे लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची टेस्ट केली. तर कर्माचं फळ दिसलंच. टेस्ट 'पॉझिटिव्ह' आली. आता मात्र मनात भीती निर्माण झाली. पण ही भीती कोरोनाची पॉझिटिव्ह असल्याची नव्हे तर आता कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार याची होती.

गृह विलगीकरणाचा कालावधी मी आनंदात घालवत होतो. OTT प्लॅटफॉर्म्स बघणे, गरमागरम जेवण करणे आणि आराम करणे अशी दिनचर्या काही दिवस सुरु होती. मात्र एकेदिवशी अचानक श्वसनाचा त्रास होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं काही वेळासाठी त्रास होईल मात्र श्वास घेण्यास अधिकच त्रास होऊ लागला. म्हणून तातडीनं दवाखान्यात भरती झालो. पुढचे काही दिवस अजिबातच सोपे नसणार याची कल्पना आधीच आली होती. त्यामुळे आता मात्र मनाची तयारी करूनच ठेवली होती.

कोविड वार्डात पाऊल ठेवताच सर्वत्र PPE किट घातलेले डॉक्टर्स आणि नर्सेस दिसू लागले. तो एखादा टिपिकल दवाखाना होता मात्र मला होणाऱ्या त्रासामुळे तो वॉर्ड एखाद्या बंदिस्त आणि खिडक्या नसणाऱ्या खोलीसारखा मला भासत होता. त्यात डॉक्टरांची लगबग, मधेच इतर रुग्णांचे खोकलण्याचे, शिंकण्याचे, कण्हण्याचे आवाज सतत माझ्या कानावर पडत होते. मन अगदी अवस्थ झालं होतं.

एक दिवस परिस्थिती अधिकच बिकट झाली. माझा श्वसनाचा त्रास अधिकच वाढत गेला आणि मला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र माझ्या आतला नागपूरकर आणि त्याचा 'सो कॉल्ड Attitude' अगदी वाळलेलं फुल गळून पडावं तसा गळून पडला. अशातच माझ्या बाजूच्या खाटेवर असणारा एक रुग्ण माझ्या डोळ्यांसमोर दगावला. एका जीवाला प्राण सोडताना बघण म्हणजे यातनाच. मनातील भीतीनं एखाद्या राक्षसासारखं रूप धारण केलं. असतील नसतील ते सर्व देव आठवले. PPE किट घातलेले डॉक्टर्स आणि नर्सेसमध्येच देव दिसू लागले.

त्यावेळी मात्र मी केली चूक, मी मोडलेले कोरोनाचे नियम, कुटुंबातील व्यक्तींचं न ऐकणं आणि विशेष म्हणजे खर्रा, दारू आणि इतर बाहेरच्या गोष्टींचं सेवन करणं हे सर्व माझ्या चटकन डोळ्यासमोर आलं. 'अपने को कूच नही होता' हे फक्त म्हणण्यापुरताच मर्यादित आहे मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती असते हे त्याक्षणी लक्षात आलं. डॉक्टरांना अक्षरशः प्राणांची भीक मागत होतो. देवासारख्या त्या कोरोना योद्धयांनी दिवसरात्र एक करून माझ्यासारख्या कित्येकांचे प्राण वाचवले आहेत.

हेही वाचा - अखेर मृत्यूनेच केली त्यांची सुटका; मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या; अख्ख्या गावात हळहळ

जीवाची किंमत काय असते हे मृत्यूच्या छायेतून परत आल्यानंतर लक्षात आलं. तुम्हाला घाबरवण्याचा किंवा भीती दाखवण्याचा माझा हेतू अजिबात नाही. मात्र सरकारकडून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात असताना आपल्यातील Attitude बाजूला ठेवून आपण संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं म्हणूनच हे पत्र. कारण मी ज्या चुका केल्यात, जे भोगलं ते तुमच्या नशिबी येऊ नये.

घराबेहर पडू नका... लक्षात ठेवा तुम्ही सुरक्षित तर तुमचं कुटुंब सुरक्षित.

- एक नागपूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.