Loksabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात एकमेव महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे. महायुतीने अद्याप उमेदवार स्पष्ट केलेला नाही. त्याचवेळी महाविकास व महायुतीतील धुसफूस संपलेली नाही. त्यामुळे रिंगणात आलेल्या महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी कोण? हा प्रश्न सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीसह रिपब्लिकन पक्षांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असले तरी रिंगण मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम कायमच आहे.
महाविकास आघाडीने कॉंग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी अमरावती लोकसभा मतदारसंघातून जाहीर करून आघाडी घेतली आहे. मात्र त्याचवेळी आघाडीतील घटक पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा कायम ठेवला असून दिनेश बूब यांचे घोडे दामटले आहे. तर प्रहार व वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट नाही. राष्ट्रवादीचा शरद पवार गट शांत आहे.
त्याचवेळी महायुतीतही धुसफूस सुरूच आहे. उपमुख्यमंत्री व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या मतदारसंघातून त्यांचाच (भाजप) उमेदवार राहणार असल्याचे म्हटले असले तरी उमेदवाराबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली आहे. भाजपला समर्थन देणाऱ्या विद्यमान खासदारांना उमेदवारीची अपेक्षा असताना भाजपमधूनच माजी महापैार संजय नरवने व सिद्धार्थ वानखडे यांची नावे समोर आली आहेत. (Latest Marathi News)उमेदवारीबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगतानाच उमेदवार मात्र भाजपचाच राहील, असेही म्हटल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.
महाविकासने उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मांडलेली चूल पेटती ठेवली असून अखेरपर्यंत उमेदवारीसाठी लढाई लढत राहण्याची भूमिका घेतली आहे. चार दिवसांनी २८ मार्चला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार अ सून चार एप्रिलपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. या चार दिवसांत महायुती व महाविकास आघाडीसह इतर इच्छुक राजकीय पक्षांना उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांतील बेचैनी वाढली आहे. (Latest Marathi News)
१६ दिवस मिळणार प्रचाराला
आठ एप्रिल ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट होणार आहे. रिंगणातील उमेदवारास उणेपुरे सोळा दिवस प्रचाराकरिता मिळणार आहेत. सहा विधानसभेच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार बघता मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.