मिरचीचे दर दिवसागणिक होताहेत कमी; शेतकऱ्यांनी आपली मिरचीची रोपे उपटून टाकली

Loss of pepper growers due to corona infection
Loss of pepper growers due to corona infection
Updated on

वेलतूर (जि. नागपूर) : मिरची काढणीचा व व्यवसायाचा हंगाम असतानाच कोरोना संक्रमणाने पुन्हा उचल खाल्ल्यामुळे पूर्वपदावर येऊ पाहणाऱ्या शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे आधीच नेस्तनाबूत झालेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. कोरोनादरम्यान पिकलेला माल बाजारपेठ व खरेदीदाराअभावी विकला जाणार नसल्याचे लक्षात घेत अनेक मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी आपली मिरचीची रोपे उपटून टाकली आहेत.

देशात पहिली टाळेबंदी झाली तोच काळ या मिरची विक्रीचा होता. त्यावेळी ६० रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या मिरचीला साधा १० रुपये किलोही भाव मिळाला नाही. कुही, उमरेड, भिवापूर, मौदा या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातींच्या मिरच्यांचे उत्पादन घेतले जाते. काढणीच्या हंगामातच पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्याने त्याचा फटका मिरची उत्पादकांना बसला आहे.

मिरची उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सुमारे साठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडांवर तयार झालेली मिरची गळून पडली आहे, तर काही ठिकाणी ही मिरची झाडांवरच पिकत चालली आहे. मिरची घेण्यासाठी किंवा इतर राज्यात पाठवण्यासाठी व्यवस्था नसल्याने मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे.

एकट्या कुही तालुक्यात मिरचीची ४७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. साध्या हिरव्या मिरचीची जिल्ह्यात १,२७५ हेक्टरवर लागवड केली जात असल्याची माहिती आहे. यामध्ये कुही व मौदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरच्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जातात. दिल्ली, राजस्थान, बेळगाव, पुणे, मुंबई, पंजाब व कोलकाता अशा मोठ्या बाजारपेठा या मिरच्यांसाठी अनुकूल आहेत.

कोट्यवधींची उलाढाल असलेले मिरचीचे हे व्यवहार टाळेबंदीत काही अंशी झाले असले तरी मोठ्या प्रमाणात व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. चीनकडून हिंदुस्थानी मिरचीची आयात बंद झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे व खरेदीदार व्यापाऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारतातून वर्षभरात किमान ५ हजार कोटींची मिरची चीनला निर्यात होत असते हे विशेष. 

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील
मिरचीचे नुकसान झाले असल्याने यासाठी अभ्यास गट स्थापन करून संबंधित माहिती गोळा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. 
- मनोज तितरमारे,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मांढळ

उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसत नाही
भारतातील एकूण मिरची उत्पादनापैकी जवळपास ७० टक्के मिरची जहाजांद्वारे चीनला पाठवली जाते. ही बहुतांश मिरची, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून जाते. आता कोरोना संकटामुळे मिरची उत्पादकांनी काय करायचे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिरचीचे दर दिवसागणिक कमी होत आहेत. उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसत नाही. 
- पंकज शेंडे,
मिरची उत्पादक

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.