नागपूर : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापले आहे. अधिवेशन काळात सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र, महाराष्ट्रातील सीमा भागातील बांधवांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता धडपडतोय.
विधानभवनावर निघत असलेल्या मोर्च्यात एकटाच आपल्या मागण्यांना घेऊन त्याने आज शेवटच्या दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्यमंत्र्यांसोबत आपली भेट व्हावी. राज्यातील विविध ज्वलंत समस्यांवर आपण चर्चा करून न्याय मागण्या आपण त्यांच्या दरबारी रेटून घेऊ, असा तो बोलताना सांगू लागला. विलास सूर्यवंशी असे त्याचे नाव.
विलास शहरातील उंटखान्यात राहतो. भाजीपाला विक्रीचा त्याचा व्यवसाय असून त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्याच्या दोन मुले मुलीचे लग्न झाले तर मुलगा नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी तो एकटाच निघाला. मोर्चा पाँइंटवर शुकशुकाट होता.
दोन मोर्चे कधीचेच निघून गेले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी कर्मचारी निवांत होते. दरम्यान विलास सूर्यवंशी हा मॉरिस टी पाँइंटवर आला. डोक्यावर निळी टोपी आणि गळ्यात मागण्यांचे फलक लावून तो विधानभवनाकडे निघाला. त्याची ही आगळी वेगळी पद्धत पाहून रस्त्याने जाणारेही एकनजर तरी त्याच्याकडे बघत होते. तो फारसा प्रतिसाद देत नव्हता. अचानक वाहतूक सिग्नल लागले अन् विलासही थांबला.
त्याला पाहून पोलिस बांधवही गोळा झाले. तो म्हणाला विधिमंडळावर मोर्चा घेऊन जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा संघर्ष सुरूच आहे. समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार वाढत आहेत. आर्थिक विषमतेची दरी वाढत आहे.
खासगीकरणामुळे कामगारांची पिळवणूक होत आहे. कामगारांना नियमाप्रमाणे किमान वेतन मिळावे, मात्र, असे होत नाही. मोजक्या लोकांचे पोट भरण्यासाठी कामगारांचा बळी घेतला जातो. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार निराशेच्या खाईत जात आहेत.
शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाण्याचे महिन्याकाठी हजारो रुपये सरकारला द्यावे लागतात. अशा स्थितीत जगणे आणि कुटुंबाला जगविणे शक्य नाही. समाजाचे हे दु:ख आणि वेदना शासन दरबारी मांडण्यासाठी मी एकटाच निघालो आहे. आयुष्यभर लढा देत राहीन.
राज्यातील सीमावाद, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शोषितांवर महिलांवर होणारे अत्याचारामुळे मन अस्वस्थ झाले आहे. कुठेतरी हे थांबावे व पीडितांना न्याय मिळावा म्हणून हा संघर्ष आहे. आपला हा एकट्याचा लढा आणि मोर्चा आहे.
- विलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.