राज्य शासनाकडून दरवर्षी सात ते दहा लाख रुपये देऊन बोळवण केली जाते. यामुळे यंत्र वारंवार बंद पडत असून गरीब रुग्णांना निदान चाचण्यांसाठी खासगीचा रस्ता दाखवला जातो.
नागपूर: मेडिकल, सुपर तसेच मेयो रुग्णालयात (medical-super and mayo hospitals) सुमारे दोनशे कोटींपेक्षा अधिक किमतीच्या १९९ प्रकारच्या यंत्रसामग्री (Machinery) आहेत. या यंत्रांवर रुग्णांच्या विविध चाचण्यांसह उपचार होतात. वॉरंटी संपल्यानंतर मेडिकल, मेयो, सुपरमधील यंत्रांच्या देखभालीसाठी सुमारे ७ कोटींची गरज असते. परंतु, राज्य शासनाकडून दरवर्षी सात ते दहा लाख रुपये देऊन बोळवण केली जाते. यामुळे यंत्र वारंवार बंद पडत असून गरीब रुग्णांना निदान चाचण्यांसाठी खासगीचा रस्ता दाखवला जातो.
मेडिकल-सुपर आणि मेयोत कोट्यवधींच्या यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी संस्थेकडून दरवर्षी "एएमसी" आणि "सीएमसी" केली जाते. यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केली जाते. एमआरआय, सिटी स्कॅन, कोबाल्ट, ब्रॅकी थेरपी, कॅथलॅब अशा महागड्या यंत्रांच्या देखभालीसाठी एएमसी आणि सीएमसीमार्फत होणारा वार्षिक खर्च कोटीच्या घरात असतो. एकट्या मेडिकलमध्ये १७९ प्रकारची यंत्रसामग्री आहे. दरवर्षी ३ कोटींचा निधी देखभालीवर खर्च होतो. तशी आर्थिक तरतूद शासनाकडून होत असते. परंतु, प्रत्यक्षात निधी देण्यात येत नाही. यावर्षी अवघे ८६ लाख मंजूर झाले, मात्र एक रुपयादेखील अद्याप मेडिकलच्या तिजोरीत पोहोचला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
यंत्र देखभालीसाठी पुरेसा निधी शासनाकडून मिळत नसल्यामुळे कॅथलॅब, सिटी स्कॅन, एक्स-रेसह विविध यंत्रसामग्री बंद पडतात. याचा फटका उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना बसतो. पर्यायाने या गरिबांना चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांचा रस्ता दाखवला जातो. यामुळे डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात येतो. मेयो रुग्णालयात यंत्र देखभालीसाठी २ कोटीची गरज आहे. मात्र दहा ते बारा लाख मंजूर करण्यात येत असल्यामुळे कंपनीकडून देखभाल दुरुस्तीसाठी कोणीही येत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. यामुळे गरिबांच्या उपचारात हयगय होत असल्याची कबुली नाव न सांगण्याच्या अटीवर डॉक्टरांनी दिली आहे.
गरज २ कोटींची, ७ लाखांवर बोळवण
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे पन्नास कोटींपेक्षा अधिक किमतींची यंत्रसामग्री आहे. ह्दयविभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, सीव्हीटीएस, नेफ्रोलॉजी, युरॉलॉजी, न्यूरॉलॉजी या विभागात यंत्रांवर रुग्णांच्या विविध चाचण्यांसह उपचार होतात. गरिबांसाठी सुपर वरदान ठरले आहे. यासाठीच कंपनीकडून यंत्राच्या देखभालीसाठी रुग्णालय आणि कंपनी यांच्यात एएमसी आणि सीएमसीचा करार केला जातो. एएमसी आणि सीएमसी केल्यानंतर निधीची तरतूद होते. सुपरमधील यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी वर्षाला सुमारे २ कोटीची गरज आहे. मात्र यावर्षी अवघे ७ लाख रुपये मंजूर केला, मात्र अद्याप हा निधी मिळाला नाही. यावरून शासन सरकारी रुग्णालयांबाबत गंभीर नसल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये आहे.
यंत्र देखभालीसाठी निधीची गरज
मेडिकल - ३ कोटी
मेयो - २ कोटी
सुपर - २ कोटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.