मानकापूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड व बिहारसारख्या राज्यांमधून उदरनिर्वाहासाठी आलेल्या मजूर रोज काम मिळेल या आशेने शहरातील विविध ठिय्यांवर येतात. यामध्ये महिलांचीही संख्या अधिक आहे. पण दुर्दैव असे की ठिय्यांवर पाण्यासह शौच्चालयाची कुठलीही व्यवस्था नसल्याने विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होते. शहराच्या विकासासाठी हातभार लावणरे मजूर स्वतः मात्र विकासापासून कोसो दूर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी नशिबी संघर्षच असलेल्या मजुरांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध होणार कधी? हा प्रश्न आहे.
गोरगरीब मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी विविध राज्यातून नागपुरात स्थलांतरित झाले आहे. काही जण रस्त्यांवर छोटी-मोठी टपरी टाकून पोट भरत आहे, तर काही मोलमजुरी करून कुटुंबीयांचे पालनपोषण करतात. या ठिय्यामुळे त्यांना दोनवेळची भाकरी मिळते पण जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. शहरात ठिकठिकाणी मजुरांचे ठिय्ये आहेत.
मानकापूर त्यापैकीच एक. हाताला काम मिळेल, या आशेने घरदार सोडून परराज्यातील अनेक पुरुष व महिला मजुरांनी काही वर्षांपूर्वी नागपुरात स्थलांतर केले. आजूबाजूच्या झोपडपट्टीत वास्तव्य करून मिळेल ते काम करीत आहेत. आजघडीला मानकापुरातील ठिय्या त्यांच्यासाठी एकप्रकारे वरदानच ठरत आहे. येथील गंगानगर झोपडपट्टीतील अनेक गोरगरीब महिला व पुरुष दररोज सकाळी भाजी-भाकर बांधून या ठिय्यावर जमतात. बिल्डिंग किंवा अन्य कामे मिळाल्यानंतर दिवसभर घाम गाळून चार पैसे कमावतात. मिळणाऱ्या रोजमजुरीतून कशीबशी घरची चूल पेटून पोटात सुखाचे दोन घास पडत आहेत.
महिन्यातून केवळ पंधरा दिवसच काम
महिन्यातून पंधरा दिवसच हाताला काम मिळत असल्याची व्यथा ज्योती धोंडेकर, लता कनोजे, माया भोंडेकर व राकेश सोनी यांनी बोलून दाखविली. त्यांना बाराही महिने काम मिळत नाही. मात्र प्रपंच चालेल इतकी कमाई होते. ठिय्यामुळे आम्हाला खूप मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. परराज्यातील हे मजूर प्रचंड मेहनती आहेत. केवळ पुरुषच नव्हे, महिलाही तितक्याच कष्टीक आहेत. त्यामुळेच अनेक कंत्राटदार खोदकामासह अन्य कठीण कामांसाठी या मजुरांना प्राधान्य देतात.
मी गेल्या १५ वर्षांपासून नियमित ठिय्यावर येते. रोजमजुरीची कामे करते. कधी काम मिळते, कधी निराश होऊन परतते. काम मिळाले तरच घरची चूल पेटते. एवढ्याशा कमाईत घर चालत नाही. सरकारी योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही, सरकारने गरिबांच्या प्रश्नांची दखल घ्यावी.
-ज्योती धोंडेकर, मजूर
उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षेने आम्ही काही वर्षांपूर्वी बालाघाटवरून नागपुरात आलो होतो. गंगानगर झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन राहतो. माझ्या परिवारात पती व तीन मुले आहेत. पती दारू पितो, काम करत नाही. त्यामुळे मलाच रोजमजुरी करून कमाई करावी लागते. कसंबसं पोट भरतो.
-लता कनोजे, मजूर
आम्ही पती-पत्नी काम मिळाल्यानंतर दिवसभर मेहनत करतो. मजुरीच्या पैशातून रात्री धान्य, किराणा व अन्य आवश्यक वस्तू आणून मुलाबाळांना खाऊ घालतो. महागाई वाढल्याने जगणे कठीण होत आहे. आहे त्या परिस्थितीत आयुष्याची गाडी ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-माया भोंडेकर, मजूर
एरवी काम मिळायला खूप अडचण जाते. मात्र ठिय्यावर आलो की छोटे-मोठे काम मिळूनच जाते. सध्या महिन्यातून दहा-पंधरा दिवस काम मिळत असल्याने पोटापाण्याची सोय होत आहे. महिनाभर काम मिळाले असते तर आणखी चांगले आयुष्य जगता आले असते.
-राकेश सोनी, मजूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.