नागपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सून पुन्हा एकदा विदर्भात सक्रीय झाला आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे शुक्रवारी दुपारी शहरातील बहुतांश भागांत धुवाधार पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर बरसलेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी तीन-चार दिवस विदर्भात यलो अलर्ट असल्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार आहे.