Motivation News : आईने गार्डची नोकरी करून घडविले धावपटुला

आईने हार न मानता सेक्युरिटी गार्ड व शहर बस कंडक्टरची नोकरी पत्करून आपल्या दोन्ही मुलांना घडविले.
Aashutosh Bavane
Aashutosh BavaneSakal
Updated on
Summary

आईने हार न मानता सेक्युरिटी गार्ड व शहर बस कंडक्टरची नोकरी पत्करून आपल्या दोन्ही मुलांना घडविले.

नागपूर - पंधरा वर्षांपूर्वी वडिलांचे आजारपणामुळे आकस्मिक निधन झाल्यानंतर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आईने हार न मानता सेक्युरिटी गार्ड व शहर बस कंडक्टरची नोकरी पत्करून आपल्या दोन्ही मुलांना घडविले. मुलगी नर्स बनून स्वतःच्या पायावर उभी झाली, तर ॲथलिट मुलाने विविध मैदानी स्पर्धांमध्ये असंख्य पदके जिंकून परिवारासह शहरालाही नावलौकिक मिळवून दिला.

ही संघर्षपूर्ण पण तेवढीच प्रेरणादायी कहाणी आहे विदर्भाचा प्रतिभावान धावपटू आशुतोष बावणेची. मूळचा देवरी (जि. गोंदिया) येथील रहिवासी असलेला व सध्या नरसाळा येथे राहणारा आशुतोष उज्ज्वल करिअरच्या शोधात २०१८ मध्ये आपल्या परिवारासह नागपुरात आला होता. हडस शाळेत शिकत असताना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मैदानी स्पर्धेत धावण्याची त्याची इच्छा झाली. फारसा सराव किंवा अनुभव नसताना त्याने सुसाट गतीने शर्यत पूर्ण करून अनेकांची वाहवा मिळविली.

मैदानी खेळ आवडल्याने त्याने या खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुरूविना मार्ग नसल्याने एका व्यक्तीच्या सल्ल्यानुसार तो नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर यांना भेटला. त्यांच्या मार्गदर्शनात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. आशुतोषने त्यानंतर मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही.

आईने गार्ड व कंडक्टरची नोकरी करून मुलाला

तीन-चार वर्षांच्या छोट्याशा करिअरमध्ये २२ वर्षीय आशुतोषने आतापर्यंत विविध ज्युनिअर व सीनियर गटातील जिल्हा, विभागीय व राज्य मैदानी स्पर्धांमध्ये ४०० व ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये ३० ते ३५ पदके जिंकली आहेत. तीनवेळा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्य आंतर विद्यापीठ स्पर्धेतही त्याने ८०० मीटर मध्ये ब्राँझपदक जिंकले आहे.

लवकरच आणखी एका राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, आशुतोषने नुकत्याच मानकापूरमध्ये आयोजित नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेतील ८०० मीटर शर्यतीत १ मिनीट ५४.७४ सेकंद ही सर्वोत्तम वेळ नोंदवून १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. एस. बी. सिटी कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या आशुतोषला अखिल भारतीय स्तरावर सुवर्ण जिंकून व देशातील टॉप आठ ॲथलिट्समध्ये स्थान मिळवून खेलो इंडियामध्ये छाप सोडायची आहे. त्याचवेळी देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून स्पोर्ट्स कोट्यातून नोकरीही मिळवायची असल्याचे त्याने सांगितले.

मुलांच्या करिअरसाठी आईची मेहनत

मुलांच्या यशस्वी करिअरमध्ये आईवडिलांचे फार मोठे योगदान असते. आशुतोषही याला अपवाद नाही. लहानपणी नियतीने वडिलांचे (रमेश बावणे) छत्र हिरावून नेल्यानंतर आईने (सुनीता बावणे) सुरवातीला पापड बनवून व नंतर सेक्युरिटी गार्डची नोकरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ केला, त्यांना उच्च शिक्षण दिले. सुनीता सध्या शहर बस कंडक्टरची नोकरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. थोरली बहीणही (शिवानी) एका खासगी रुग्णालयात नर्सची नोकरी करून आशुतोषच्या स्वप्नाला बळ देण्यात मदत करीत आहे. स्वतः आशुतोषने देखील क्रीडा क्षेत्रात मोठे नाव कमावून आई व बहिणीच्या मेहनतीचे चीज केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.