वाराणसीमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवू, 'या' खासदाराचे थेट मोदींना आव्हान

mp balu dhanorkar criticized bjp government and pm modi in nagpur
mp balu dhanorkar criticized bjp government and pm modi in nagpur
Updated on

नागपूर : पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू आणि जिंकूनही दाखवू, असे म्हणत चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले. शनिवारी त्यांनी वाराणसीला भेट दिली. मोदी दुसऱ्यांदा येथून खासदार झाले आहेत, तरीही या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झाला नाही आणि हे लोक करूही शकत नाही. ईव्हीएमने आलेले हे सरकार आहे. यांच्यात धमक असेल, तर आगामी निवडणूक ईव्हीएम सोडून मतपत्रिकांवर घ्यावी, असे आव्हान धानोरकर यांनी सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. 

वाराणसीमध्ये गेल्यावर त्यांनी काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शन घेतले. अस्सी घाटावर गंगा आरतीमध्येही ते सहभागी झाले. यानंतर वाराणसीच्या विकास कामांवर प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. यावेळी खासदार धानोरकर म्हणाले, संपूर्णानंद विद्यापिठातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेलेले नाही. वसतिगृहातही खाण्यापिण्याच्या सुविधा चागंल्या नाहीत. देशाच्या पंतप्रधानांच्या मतदारसंघाची अशी अवस्था असेल, तर देशात काय चित्र असेल, याची कल्पनाही न केलेलीच बरी. पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे, हे समजून येथे येणाऱ्याची निराशा झाल्याशिवाय राहत नाही. 

ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी सांगितले होते की, गंगा नदीचा विकार करणार, तसा तो झालेला नाही. येथे व्यवसायाच्या संधी नाहीत. नोटाबंदी आणि कोरोनाच्या स्थितीनंतर येथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाषणांतून घोषणा करणे आणि प्रत्यक्ष काम करणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रस्त, नाल्या, इमारती आणि पूल बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकास म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम आणि जनता समाधानी, असा आहे. पण ही गोष्ट केंद्रातील सरकार अजून समजलेली नाही, असे दिसतंय. दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा घणाघाती आरोप खासदार धानोरकर यांनी केला. 

केंद्र सरकारवर तोफ डागताना खासदार धानोरकर म्हणाले, दिल्लीच्या सिमांवर कित्येक शेतकरी आंदोलन करताना मरण पावले. पण मोदी सरकार अजूनही अडून आहे. कृषी कायदे रद्द करणार नाही, असे ते ठामपणे सांगत आहेत. देशातील ५७ टक्के लोक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना जर हे सरकार अशी वागणूक देत असेल, तर शेतकरी यांना कधीही माफ करणार नाही. भाजपच्या मंत्र्यांनाच त्यांच्या पक्षातील इतर मंत्र्यांची नावे माहिती नाहीत. पक्षातील लोकांना माहिती आहेत, ते फक्त आणि फक्त मोदी व शहा. हे सरकार ईव्हीएमने आलेले सरकार आहे. भाजपवाल्यांमध्ये जर धमक असेल, तर त्यांनी मतपत्रिकांवर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान खासदार धानोरकर यांनी दिले. मतपत्रिकांवर निवडणूक झाल्यास जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा टोलाही त्यांनी हाणला.

निवडणूक नसलेल्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली -
आज मोदी सरकारने अर्थसंकल्पात केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून निवडणुकीच्या तोंडावर लॉलीपॉप दिला आहे. इतर राज्याच्या तुलनेत या चारही राज्यासाठी 2.27 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार धानोरकर यांनी आजच्या अर्थसंकल्पावर दिली. देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भरीव काही तरतूद करण्यात आली नाही. कोरोनामुळे देशात हजारो रोजगार गेले, रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काही नाही. मध्यमवर्गीयांसाठी आयकरात सूट अपेक्षित होती. त्यामध्ये काही दिलासा दिलेला नाही. एअर इंडीया, एलआयसीला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने घेतला आहे. सरकारी जमीनी विकणार, बीपीसीएल पण सरकार विकणार असून हे सरकार सरकारी मालमत्ता विकणारे सरकार ठरणार आहे. 

आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलेले नाही. महिला सबलीकरण याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसावर अन्याय करण्यात आला आहे. 'अच्छे दिन'चा लॉलीपॉप देऊन हे सरकार दोनदा सत्तेत आले. आधीच पेट्रोल आणि इतर इंधनाचे दर मात्र शंभरी पार करत आहेत. त्यात या बजेटमध्ये डिझेलवर ४ रुपये व पेट्रोलवर २.५० रुपये कृषीकर लावण्यात आला आहे. जीएसटीमधील कमतरता दूर करण्याचे केवळ आश्‍वासन दिले जात आहे. त्यामुळे देशातील व्यापारी वर्ग मोदी सरकारवर संतापलेला आहे. मोबाईल चार्जरसारख्या ज्या चैनीच्या नव्हे तर प्रत्येकाच्या गरजेच्या वस्तू आहे. त्या सुद्धा महागल्या आहेत. या सर्व कारणांमुळे आता मात्र या देशाच्या शेवटच्या माणूस व शेतकरी या मोदी सरकारला आपली जागा नक्की दाखवेल, असे खासदार धानोरकर म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.