हिंगणा : सणासुदीचा काळ असतानाही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. ६ सप्टेंबर रोजी जंम्पर तुटल्यामुळे रात्री तब्बल एक तास वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोख पसरला. वारंवार होणाऱ्या ‘ब्रेक डाऊन’ मुळे जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक दिवशी बत्ती गुलचा खेळ सुरू आहे. याकडे महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केले आहे. वीज बिल वसुलीसाठी मात्र वीज कर्मचारी ग्राहकांकडे तगादा लावत आहे. महावितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे हिंगणा परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वानाडोंगरी येथील वीज उपकेंद्रातून हिंगणा शहराला वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात वारंवार ‘ब्रेक डाऊन’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपकेंद्रात वेळेवर मेंटेनन्सची कामे केली जात नसल्याने ‘ब्रेक डाऊन’ होण्याचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा जनतेत सुरू आहेत. वानाडोंगरी येथील उपकेंद्रातून हिंगणा, रायपूर व वानाडोंगरी शहराला वीज पुरवठा केला जातो. यामुळे या उपकेंद्रात काही बिघाड निर्माण झाल्यास या तीनही शहरात वीज पुरवठा खंडित होतो.