नागपूर : गुटखा, तंबाखू, सिगारेट, गांजा मद्यपानाचा सर्वच वयातील व्यक्तींना विळखा आहे. परंतु यात १२ ते १७ या वयोगटातील मुलेही नशेच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत या मुलांना कुठल्या ना कुठल्या नशेची सवय जडली असल्याचे एका व्यसनमुक्ती केंद्रात दर महिन्याला दाखल होणाऱ्या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.
मुलांच्या नशेमुळे पालकांच्याही जीवाला घोर लागला असून शहरात अंदाजे तीस हजारांवर मुले नशेच्या विळख्यात अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिगारेट, मद्यपान, गांजासह वेगवेगळ्या नशा करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे यात १२ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलेही मागे नसल्याचे दिसत आहे.
नुकतेच केंद्र सरकारनेही १२ ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले नशेच्या आहारी गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. देशात १२ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या १५ कोटी आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के मुले नशेच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. शहरात नुकतीच कोविड लसीकरणासाठी महापालिकेने १२ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील मुलांची आकडेवारी जाहीर केली होती.
या दोन्ही वयोगटातील अर्थात १२ ते १७ वयोगटातील ३ लाख ३४ हजार मुले नागपुरात आहेत.
घरातील ‘लाडके’ नशेच्या विळख्यात?
यातील दहा टक्के अर्थात ३३ हजार मुलांना नशेची सवय लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात दर महिन्याला सहा ते सात या वयोगटातील मुले उपचारासाठी दाखल होत असल्याने घरातील लाडकी मुले पालकांपुढे नवे संकट उभे करीत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार सात महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी ५७ गुन्ह्यात पकडलेले ४११ किलो अंमली पदार्थ नष्ट केले. या अंमली पदार्थांची किंमत पावणे दोन कोटी रुपये होती.
शहरात सातत्याने गांजा तस्करीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी १६ लाख रुपयांचा १०७ किलो गांजा जप्त केला होता. पोलिसांच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.
परंतु पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करून शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणले जाते. अऩेक पानटपऱ्यांवर गांजा व तत्सम अंमली पदार्थ विकले जाते.
विशेष म्हणजे यात कॉलेज व शालेय विद्यार्थीही रात्री जागून अभ्यासासाठी सिगारेटसह काही अंमली पदार्थांचा वापर करीत आहेत. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागलाच, शिवाय नवी पिढी यात गुंतत असल्याने समाजातही चिंतेचे वातावरण आहे.
इन्फो
१२ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या
देशात ः १५ कोटी
नशेच्या आहारी गेलेल्यांची संख्या ः १.५ कोटी
शहरात ः ३ लाख ३४ हजार
नशेच्या आहारी गेलेल्या मुलांची संख्य ः ३० हजारांवर
व्यसनमुक्ती केंद्रात १२ ते १७ वयोगटातील मुलेही उपचारासाठी दाखल होतात. वर्षात १५ ते २० मुले उपचारासाठी येतात. त्यांच्यावर उपचारासोबतच समुपदेशनही केले जात आहे.
या मुलांना व्हाईटनर, वाहनाचे टायर पंक्चर दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे सोल्यूशन, कोरेक्स सिरप, सिगारेट, बिडी, गुटखा व दारूचे व्यसन असलेल्यांचा समावेश आहे. नशेत गुन्हेगारी करणारी मुलेही येतात. नुकताच एका १७ वर्षांच्या मुलाला शांतीनगर पोलिसांनी दाखल केले होते.
- विनोद शेंडे, साहस व्यसनमुक्ती केंद्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.