नागपूर : ११ नगर परिषद निवडणुकांचे वाजणार बिगूल

प्रभाग रचनेची निघाली सूचना; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मतदान
Nagpur 11 Municipal Council Elections Voting in August September
Nagpur 11 Municipal Council Elections Voting in August Septemberesakal
Updated on

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम काही दिवसात वाजणार असून त्या पाठोपाठ जिल्ह्यातील ११ नगर परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेविषयी अधिसूचना जाहीर केली आहे. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता नाकारत येत नाही. अधिसूचना जाहीर होताच राजकीय पक्षाने कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील ११ नगर परिषदेची मुदत लवकर संपणार असून काही नगर परिषदांची मुदत संपली आहे. अशा नगर परिषदांच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. जिल्ह्यातील, रामटेक, कळमेश्वर ब्राम्हणी, सावनेर, खापा, मोहपा, उमरेड, कामठी, वाडी, काटोल, मोवाड आणि नरखेड नगर परिषदेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. या ११ ही नगर परिषदेच्या प्रभाग रचनेस निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून प्रभागरचनेसह आरक्षणाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या निवडणूक कार्यकर्त्यांसाठी राजकीय कारकिर्द तयार करण्‍यास मोठी जमेची बाजू असते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार मिळत असल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असते.

जिल्ह्यातील नेत्यांसाठी ११ नगर परिषदा महत्त्वाच्या आहेत. कोरोनामुळे काही नगर परिषदांच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. तर काही नगर परिषदांची मुदत एप्रिल महिन्यात संपली आहेत, तर काहींची सप्टेंबरमध्ये संपणार आहे. नगरसेवकांच्या आरक्षणाची जाहीर सूचना १० जूनला जाहीर करण्यात येणार आहे. १३ जूनला नगर परिषदेचे मुख्याधिकारी आरक्षणाची सोडत काढतील. त्याप्रमाणे १५ ते २१ जूनपर्यंत त्यावर हरकती मागण्यात आल्या आहेत. २४ जूनपर्यंत आरक्षण सोडतीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होईल. २९ जून रोजी विभागीय आयुक्तांकडून आरक्षणाला मान्यता देण्यात येईल. तर १ जुलै रोजी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

कार्यकर्ते झाले सक्रिय

नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या कार्यकर्त्यांना आता नशीब अजमाविण्याची संधी मिळणार आहे. कोरोना निवडणूका न झाल्याने अनेक पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. आता निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. प्रभाग आणि आरक्षणासंदर्भात अधिसूचना निघाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात तापणार आहे.

तीन वर्षांनंतर होणार मोवाडची निवडणूक

नरखेड तालुक्यातील मोवाड नगर परिषदेची मुदत संपून ३ वर्षे झाली आहेत. १७ मे २०१९ रोजी या नगर परिषदेची मुदत संपली. तेव्हापासून यावर प्रशासकाची नेमणूक केली आहे. गेल्या तीन वर्षात या नगर परिषदेचा विकास खुंटला आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या, मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. कोरोनाचे कारण सांगून वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता तब्बल तीन वर्षानंतर निवडणूक होणार असल्याने प्रशासक राज लवकरच जाणार असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांवर भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी मोठी विकासाची कामे केली होती. तसेच नगर परिषदांना विकास कामांसाठी भरपूर निधीही दिला होता. त्यामुळे शहरांचा विकास झाला आहे. त्या बळावर पुन्हा जिल्ह्यातील ११ नगर परिषदांवर भाजपची सत्ता येईल, यात कोणताही शंका नाही. निवडणुकांसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. त्यामुळे विजय आमचाच होईल, यात शंका नाही.

-अरविंद गजभिये, भाजप जिल्हाध्यक्ष, नागपूर ग्रामीण

जिल्ह्यातील निवडणुकांसाठी कॉंग्रेस पक्ष तयार आहे. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात ११ नगर परिषदेमध्ये सत्ता येईल, यात शंका नाही. प्रत्येक नगर परिषदेमधील कार्यकर्ते तयार आहे. यासंदर्भात लवकरच बैठका घेण्यात येतील. निवडणुकीसाठी कॉंग्रेस तयार हे निश्चित.

- हुकुमचंद आमधरे, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते, कामठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.