Nagpur Accident 5 Died: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अपघातग्रस्त दुचाकीचालकाला मदत करण्यासाठी थांबलेल्या कारवर भरधार टिप्पर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेत बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी २५ प्रवासी जखमी झाले.
चिखलदरा (जि. अमरावती) ः तालुक्यातील परतवाडा ते धारणी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून परतवाडा आगाराची बस रस्त्यापासून ५० फूट अंतरापर्यंत दरीत शिरली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर २५ प्रवासी गंभीर जखमी झाले. रविवारी (ता. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदू गणत्रे (वय ६०, रा. मोरी खकणार, मध्यप्रदेश) व ललिता चिमोटे (वय ३०, रा. बुरजघाट, ता. अचलपूर), अशी मृत महिलांची नावे असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली.
अपघातग्रस्त एसटी परतवाडा आगाराची आहे. जखमींना सेमाडोह प्राथमिक आरोग्यकेंद्र, त्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना उशिरा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. एमएच ०७ ई ९४७९ क्रमांकाची एसटी बसगाडी परतवाड्यावरून मध्य प्रदेशातील तुकईथड येथे जाण्यास निघाली. जवाहरकुंडजवळ वळण रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित एसटी रस्त्यापासून ५० फूट अंतरावर दरीत कोसळली. एका झाडावर अडकल्याने इतरांचा जीव वाचला. या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकासह दुचाकीस्वारांनी अपघातग्रस्त एसटीतील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. वृत्त लिहिस्तोवर चिखलदरा पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती. (Latest Marathi News)
हिंगणघाट (जि. वर्धा) : नादुरुस्त स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वाळू भरलेल्या टिप्परवर मागून येणारी दुचाकी आदळली. अशात दुचाकीचालकाच्या मदतीसाठी कार थांबली. जखमीला मदत करण्यास उतरताच समोरून भरधाव येणाऱ्या वाळू भरलेल्या टिप्परने कारला उडवले. ही घटना वडनेर ते शिरसगाव रस्त्यावर येरणगावनजीक शनिवारी (ता. २३) रात्री पावणेआठ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना वडनेर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विजय देवतळे (वय ४५),अक्षय कोलकडे (वय २५) दोन्ही रा. येरणगाव, राहुल नैताम (वय २७) रा. अलमडोह) अशी मृतांची नावे आहेत. तर रतन पचारे (रा. कात्री) आणि अर्जुन मोरे (वय ३५) अशी जखमींची नावे आहेत.
वडनेर ते शिरसगाव रस्त्यावर सुरकार यांच्या शेताजवळ एक टिप्पर सकाळपासूनच नादुरुस्त स्थितीत उभा होता. दरम्यान, मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीचालकास टिप्पर न दिसल्याने दुचाकी त्यावर आदळली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. दरम्यान, शिरसगावकडून एम एच ३२ एएस ४८३७ क्रमांकाची कार तेथे थांबली. कारमधून काही जण उतरले आणि जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. जखमीला कारमध्ये बसवत असतानाच वडनेरकडून भरधाव येणाऱ्या एमएच ३१ एफसी ०४३४ क्रमांकाच्या वाळू भरून असलेल्या भरधाव टिप्परने कारला चिरडले.
बस अपघातातील जखमींची नावे
मनोज पाखरे (वय ३४, रा. चौसाळा), प्रदीप बेठेकर (रा. भिरोंजा), द्रोपती किशोर भारवे (वय ४०, रा. चिखली), प्रियंका संज्जू जामूनकर (वय २१, रा. दोरी), सलीम खोकर (वय ७४, सेमाडोह), रामचंद्र रामजी सेलूकर (वय ६८, रा. भरोंजा), महेश किशोर भारवे (वय २१, रा. शेंदाबाज), आरती हिरालाल भिलावेकर (वय २५, धारणी), किशोर भारवे (वय ६५, रा. चिखली), रूपाली योगेश तंतरपाळे, अंशू सुनील भारवे (वय १५), दिशा मंगेश भारवे (वय ४, दोघेही रा. चिखली), गानू मंगल तोटा (वय ७२, रा. हतरू), हिराय गानू तोटा, प्रमिला हिराजी काकडे (वय ४८, रा. सेमाडोह), रेखा राजू जावरकर (वय ४०, रा. हिराबंबई), मीरा तोटे, प्रांजली कास्देकर, भाग्यश्री दहीकर, आरती भिलावेकर, कृष्णा आसोलकर, पूनम बेठे, गानू तोटा.(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.