Nagpur News : शहरात सातत्याने फसवणुकींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये होणाऱ्या गुन्ह्याच्या नोंदीतही वाढ होताना दिसून येत आहे. आज शहरात चार जणांना जवळपास कोट्यवधींनी फसवणूक केल्याचा घटना उघडकीस आल्यात. यामध्ये व्यावसायिकांसह युवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेअर बाजार व क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २ कोटी ५९ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी महिला डॉक्टरला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सावरकरांच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेकांना आमिष दाखवून फसवणूक केली होती. याबाबत अनेकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
डॉ. प्रीती नीलेश राऊत (रा. वर्धा), असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तिची पाच दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या फसवणुकीचा सूत्रधार विराज सुहास पाटील (रा. मुंबई) हा आहे. विराज हा सध्या कोलकाता ईडीच्या कोठडीत आहे.
याप्रकरणातील अन्य आरोपी सूरज सावरकर (रा. सेलू), सुरेंद्र सावरकर, प्रीतीचा पती डॉ. नीलेश राऊत, प्रियंका खन्ना, पी. आर. ट्रेडर्सचा प्रिन्सकुमार, एम. आर ट्रेडर्सचा राकेशकुमार सिंग, टी. एम. ट्रेडर्सचा अमन ठाकूर, आर. के. ट्रेडर्सचा राहुल कुमार (रा. अकोला) व ग्रिनव्हॅली अॅग्रो कोलकाता हे फरार आहेत.
नागपूर सुधार प्रन्यासमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लॉटचे बनावट दस्तऐवज आणि संस्थेच्या खोट्या स्वाक्षरी घेऊन त्यावर अतिक्रमण करणाऱ्या सहा जणांविरोधात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप कृष्णराव साखळे (वय ५९, रा. सुर्वेनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चरणदास नाभाजी शेंडे, मीनाक्षी चरणदास शेंडे, अजय चरणदास शेंडे (सर्व रा. सुंदरबाग, गड्डीगोदाम), गणेश रामभाऊ वानखेडे (रा. लाव्हा, वाडी), नीलेश वानखेडे, अनिल शेंडे अशी आरोपींची नावे आहेत. दिलीप साखळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिपाई पदावर कार्यरत आहेत. ते श्री साई गृहनिर्माण संस्थेचे सचिव आहेत.
संस्थेच्या सभासदांकरिता, अध्यक्ष आणि सदस्यांच्या संमतीने त्यांनी मौजा हजारीपहाड येथे १९८७-८८ मध्ये गोविंदराव चालखोर आणि पार्वतीबाई चालखोर यांच्याकडून श्री साई सेवाश्रम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने ले-आऊट टाकले. याशिवाय तिथे आपल्या संस्थेच्या नावाने बोर्डही लावला. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या जागेविषयी
एका पेपरमध्ये जाहिरात दिसून आली. त्यात ही जागा चरणदास शेंडे यांनी गणेश वानखेडे यांना विक्री केल्याचे आढळून आले. त्यामुळे संस्थेच्या सदस्यांनी वकिलांशी संपर्क साधला. त्यांनी नीलेश वानखेडेशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावरून त्यांना जागेच्या कागदपत्रास भेटण्यासाठी विचारणा केली असता, ते टाळाटाळ करीत होते.
त्यामुळे याबाबत नागपूर सुधार प्रन्यासमध्येही गेल्यावर तिथेही त्यांचे नाव असल्याचे आढळून आले. दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन तपासणी केल्यावर त्यांनी बनावट दस्तऐवज, शिक्के आणि अध्यक्ष विनायक चांद्रायण यांच्या नावाची खोटी स्वाक्षरी करीत ती जमीन स्वतःच्या नावावर केल्याची बाब समोर आली.
विशेष म्हणजे, त्या जागेवर मीनाक्षी शेंडे यांच्या नावाचा बोर्ड आणि आवारभिंतही उभारण्यात आली होती. त्यामुळे याबाबत गिट्टीखदान ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही जणांविरोधात गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.
शालेय पुस्तके खरेदीचे ७६ लाख रुपये न देता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुंबईतील व्यावसायिकांसह त्यांच्या भागीदारांविरोधात पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंकजसिंग जीतसिंग (वय ४९, रा. साई सेवाश्रम सोसायटी, हजारीपहाड) यांनी तक्रार दिली होती.
चिराग काशीनाथ डे (रा. भोईसर, मुंबई), दीपक शिवशंकर मोर्य (रा. नालासोपारा, वसई, पालघर, मुंबई) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांचे बालाजी बुक एजेन्सी नावाने दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजसिंग यांचे लहान बंधू शैलेश जीतसिंग (वय ४८) यांच्या नावाने शैल्स इंटरनॅशनल नावाने कंपनी आहे.
या कंपनीची संपूर्ण जबाबदारी पंकजसिंग सांभाळतात. कंपनीच्या माध्यमातून शहरातील शाळांना गेल्या दहा वर्षांपासून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. दरम्यान मुंबईतील चिराग डे आणि दीपक मोर्य यांनी ३१ मार्चला त्यांची भेट घेऊन त्यांना ७६ लाख ६८ हजार रुपयांच्या पुस्तकांची मागणी केली.
त्यानुसार लेखी करारनामा करीत १ जूनपर्यंत पंकजसिंग यांनी पुस्तके त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविले. त्यासाठी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून त्यांच्या खात्यात एक लाख रुपये टाकले. याशिवाय ९० दिवसांत उर्वरित रक्कम देण्याची बतावणी केली.
मात्र, त्यानंतर त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. शिवाय फोनवरही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन बघीतले असता, ते बंद असल्याचे आढळले. आधारकार्डवर दिलेल्या पत्त्यावर तिथे राहत नसल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे चिराग यांचे भागीदार दीपक मोर्य यांच्याशी व्यवस्थापकाने संपर्क केला असता, त्यांनी चिराग हे भागीदार नसल्याचे सांगितले. याशिवाय तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नसल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.