उमरेड : स्त्रियांच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारची केशरचना व सौंदर्याच्या दृष्टीने खर्च करतात. पुरुष मंडळी हेअर सलूनमध्ये जाऊन केशकर्तन, दाढी वगैरे करतात. परंतु म्हशींना देखील केशकर्तनाची गरज भासते, हे तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल. उमरेड शहरात चक्क म्हशींचे केशकर्तनालय असून तेथे म्हशींना भादरण्याचे काम केले जाते.
थंडीचा जोर कमी होऊन फेब्रुवारी महिना संपायला आला असतानाच उन्हाचा जोर वाढू लागला आहे आणि गुढीपाडवा सण तोंडावर आला. उमरेड शहरातील पशुपालकांकडे असणाऱ्या म्हशींच्या अंगावरील वाढलेले केस काढण्यासाठी म्हशी भादरण्याचे काम करणाऱ्या गारवडी समाजातील ५५ वर्षांचे माधवराव हातात एक मध्यम आकाराचा सुरा (वस्तरा) घेऊन पशुपालकांच्या गोठ्यातील म्हशी भादरताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
त्यांना भेटून ‘सकाळ’ प्रतिनिधीने बातचीत केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात जवळपास ५० घरांची वसाहत ( झोपडपट्टी) असून जवळपास ५०० इतकी लोकसंख्या आहे.
त्या समाजातील काही महिला, पुरुष, बालके भंगार वेचून अर्थार्जन करतात तर काही कान सफाई तर माधवरावसारखे म्हशी भादरण्याचा पिढीजात व्यवसाय पारंपरिक पद्धतीनेच करतात. माधवरावांच्या आधी त्यांचे आजोबा, वडील हा व्यवसाय करायचे.
नंतर जेव्हा छोट्या माधवकडे या व्यवसायाची धुरा आली. तेव्हा ते १० रुपये प्रति म्हैस घ्यायचे, तर आता ते एक म्हैस भादरण्याचे ९० रुपये घेतात. एका दिवसात ८ ते ९ म्हशीचे केशकर्तन करतात. त्यातून परिवाराची गुजराण करतात.
केव्हा होतो धंदा?
दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला दिवाळीपूर्वी व उन्हाळ्याच्या सुरुवातीला गुडीपाडव्याच्या आधी उमरेड शहरातील समस्त पशुपालक साधारणतः १५०० म्हशींना केसमुक्त करीत असतात. या माध्यमातून गारवडी समाजाच्या माधवरावांच्या हाताला काम मिळत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.