१२ डिसेंबर पश्चिम अाफ्रिकेतून आला पहिला ओमिक्रॉनबाधित
२३ डिसेंबर दुबईतून परतलेला दुसरा ओमिक्रॉनबाधित
२७ डिसेंबर दुबईतून परतलेली महिला ओमिक्रॉनबाधित
नागपूर : ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने उपराजधानीत प्रवेश करून करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. पंधरा दिवसात तिघांना ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने विळख्यात घेतले. हळूहळू कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा फास आवळला जात आहे. सोमवारी (ता.२७) पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार तिसऱ्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद उपराजधानीत झाली आहे. हनुमानगर झोन मधील २९ वर्षीय महिला ओमिक्रॉनबाधित आढळली. या महिलेच्या पतीचे जिनोम सिक्वेन्सिंगचे नमुने सात दिवसानंतरही प्रतीक्षेत आहेत.
हनुमानगर झोनमधील ओमिक्रॉनने बाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. या महिलेचा पती कोरोनाबाधित असून एम्समध्ये दाखल आहेत. त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून येणे बाकी आहे. १५ डिसेंबर रोजी सदर महिला आपल्या पतीसह दुबई येथून मुंबईला विमानाने आली होती. दुबईत या दाम्पत्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह होते. यामुळे मुंबईत त्यांची चाचणी झाली नाही. डोमेस्टिक फ्लाईटने सदर दांपत्य नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले.
महापालिकेचा निष्काळजीपणा भोवणार
मुंबईत चाचणी केली नाही. यानंतर नागपुरात आल्यानंतही त्यांची कोरोना चाचणी झाली नाही. थेट हे दांपत्य आपल्या घरी पोहचले, याची खबरबात महापालिका प्रशासनाला नव्हती. चार दिवसानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सदर दाम्पत्याची माहिती मुंबई प्रशासनाकडून आली. त्यानंतर नागपूरचे प्रशासन खडबडून जागे झाले.
१९ डिसेंबर रोजी दोघांचीही कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. २० डिसेंबर रोजी आलेल्या अहवालामध्ये पतिपत्नी कोरोनाबाधित आढळले. सौम्य लक्षणे असल्याने त्वरित आरोग्य विभागाने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने दोघांचेही नमुने ओमिक्रॉनच्या चाचणीकरिता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यात महिला ओमिक्रॉनबाधित आढळली.
सोमवारी १२ कोरोनाबाधित
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका असतानाच कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली. रविवारी ३ हजार ३०५ चाचण्या होताच ३२ जण बाधित आढळले होते. तर सोमवार (ता.२७) रोजी जिल्ह्यात केवळ २ हजार ४५१ चाचण्या झाल्या. यात १२ जण कोरोनाबाधित आले असून शहरातील ८ तर नागपूर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी दोन अशा १२ जण आढळले. दिवसभरात शहरातून ५ व ग्रामीणमधून २ असे ७ जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय कोरोनाबाधितांचा आलेख चढत आहे.सध्या शहरात ९१, ग्रामीणमध्ये १२ व जिल्ह्याबाहेरील ६ असे १०९ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.