नागपूर - अंगावर ना धड कपडे ...ना धड अंथरूण, जवळ पोचताच अंगातून येणारी दुर्गंधी...हे किळसवाणं दृश्य दिसल्यानंतर कोणी त्याच्याजवळ जाण्यास धजावणार नाही. मात्र अर्धमेल्या,रस्त्यावर पडलेल्या, यातनांनी विव्हळणाऱ्या मनोरुग्णांना मायेने तो कुरवाळत आंघोळ घालून देतो, अन्नही भरवतो. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण प्रेमाची देवाण-घेवाण करणारा हितेश बनसोड. सामाजभान असलेला वयाच्या पत्तीशीतील हा तरुण जात-पात-धर्म पंथाला छेदून या मनोरुग्णांसाठी संवेदनशील मित्र ठरला आहे.
नागपूर महापालिकेच्या पुढाकारातून मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘सुदामा मित्र'' योजनेची घोषणा २०१३ मध्ये केली होती, परंतु सरकारी काम अन् वर्षानुवर्षे धांब, अशी या योजनेची अवस्था झाली. ९ वर्षांनंतरही ही घोषणा हवेतच आहे. मात्र बांधिलकीतून हितेशने ‘हितज्योती’ संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णांशी मैत्री सुरू केली.
सात वर्षांपासून मनोरुग्णांशी फुललेल्या या मैत्रीच्या नात्यातून सुमारे तीनशेवर मनोरुग्णांना नेपाळ, भुतान, बांगलादेशच नव्हेतर गुजरात, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवून देण्याची जबाबदारी हितेशने मित्र म्हणून पार पाडतोय. सध्या २८ जणांवर प्रादेशिक मनोरुग्णालयांपासून तर विविध निवारा केंद्रात पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनोरुग्णांवर मनोरुग्णालय तसेच इतर सुविधा केंद्रात वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. त्यातून जे बरे होतात. त्यांना त्यांच्या घरी पोचवून देण्याचा प्रयत्न हितेश करीत आहे.
पत्नी ‘ज्योती’ची साथ
हल्ली आपले कुटुंब म्हणजे सारेकाही. याच चाकोरीत स्वत:साठी जगणारे दिसतात. परंतु मनोरुग्णांचे दु:ख पाहून नवऱ्याचे मन द्रवित झाल्यानंतर हितेशची पत्नी ज्योती यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावतात. नाभिकाला बोलावून मनोरुग्णांची दाढी, कटिंग करण्यासाठी अधिकचे पैसे लागतात, यामुळे हितेश आणि ज्योती दोघेही संकोच न बाळगता मनोरुग्णांचे केस कापून देण्यासाठी पुढे असतात. ही सुश्रुशा बघून त्यांची मुलगी रुद्राक्षी आणि मुलगा प्रहार यांच्यावरही लहानपणापासून मानवता जपण्याचे संस्कर होत आहेत.
रस्त्यावर अपघातातीब जखमींकडे बघण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी सध्या कोणालाच वेळ नाही, त्यात रस्त्यावर पडलेल्या मनोरुग्णांकडे कोण लक्ष देणार. एकदा स्वतःलाच याचा अनुभव आला अन् गांभीर्य कळले. समाजात मनोरुग्णांकडे व्यंगाने बघितले जाते, मात्र त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणून त्यांच्या यातना जवळून बघितल्यानंतर, त्यांचे दुःख कळते. यामुळेच त्यांच्यासाठी काम करणे सुरू केले.
-हितेश बनसोड, मनोरुग्णांचा मित्र, सावनेर-नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.