काजल गणवीर
धंतोली : येथील नागपूर जिल्हा ग्रंथालयात वाचकांसाठी वाचनानंदाचा खजिना उपलब्ध असताना त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. ग्रंथालयात विविध विषयांवर तब्बल ८० हजार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु प्रत्यक्षात वाचनासाठी १० ते १५ जणच येत असल्याची खंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी व्यक्त केली.
एवढ्या मोठ्या ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांचा आकडा अत्यंत कमी असून, वाचन संस्कृती जपणाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे. यामागे ई-पुस्तकांचा वाढता व्याप की ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचण्यासाठी लोप पावत चाललेली आवड कारणीभूत आहे, हे कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले.
वाढते माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि ई-बुक्सच्या वापरामुळे ग्रंथालयात जाऊन कथा, कादंबऱ्या आणि आत्मचरित्र वाचण्याची लोकांची सवय कमी झाली. त्यामुळे शासकीय जिल्हा ग्रंथालयात १ लाख ५ हजार १५ पुस्तकांपैकी जवळपास ८० हजारांवर अवांतर वाचनाची पुस्तके कपाटात धूळखात पडून आहेत. मोबाईल आणि गुगलवर सहज आणि सोप्या पद्धतीने माहिती व पुस्तके उपलब्ध होत असल्याने ‘हार्ड कॉपी’ पुस्तकांकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
एकेकाळी अवांतर वाचनाच्या निमित्ताने भरगच्च राहणारे ग्रंथालय आता केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी व्यापले आहे. स्पर्धा परीक्षार्थींची गरज लक्षात घेऊन नागपूर जिल्हा ग्रंथालयात दिव्यांग तसेच इतरांकरिता मोफत वाचन कक्षाची व्यवस्था आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे दीडशेच्या जवळपास विद्यार्थी नियमित येथे अभ्यास करतात.
यात मुलींची संख्या जास्त आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू असणाऱ्या या ग्रंथालयात पोलिस भरती, बँकिंग, एमपीएससी व एसएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भरणा आहे. त्यामुळे ग्रंथालयात या विषयांची मुबलक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून स्पर्धा पुस्तकांची यादी मागून पुस्तके खरेदी केली जातात, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी दिली.
अंध व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था
ग्रंथालयात अंध व्यक्तींसाठी वाचनाची विशेष व्यवस्था आहे. त्यांना वाचता यावे म्हणून ब्रेल लिपीतील पुस्तकेसुद्धा येथे उपलब्ध आहेत. यात विविध भाषांतील दोन हजारांच्या वर जगप्रसिद्ध पुस्तके येथे ब्रेल लिपीत उपलब्ध आहेत. तेनालीराम ते चाणक्य अशा विविध गटांतील पुस्तकांचे ब्रेल व्हर्जन ग्रंथालयात मिळतात. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील दुर्मीळ ग्रंथ, कादंबरी, कवितासंग्रह व शब्दकोश येथे उपलब्ध आहेत.
ग्रंथालयातर्फे वाचकांना आवाहन
या ग्रंथालयाची सुरुवात १९५५ मध्ये तेव्हाच्या सी. पी. ॲण्ड बेरार प्रांतात झाली. १९६७ साली महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाअंतर्गत जिल्हा ग्रंथालयाला सामील करण्यात आले. यात २२४४ सर्वसाधारण सभासद असून, ९९ संस्था सभासद आहेत. ग्रंथालय पूर्णपणे निःशुल्क असून, वाचकांनी वाचनाची आवड कायम ठेवून नियमित वाचनालयात यावे, असे आवाहन ग्रंथालय अधिकारी सोनोने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.