नागपूर : ड्रायव्हिंग स्कूल संचालकाला १८ लाखांनी गंडा; फसवणुकीचा गुन्हा दाखल

‘सीएसआर’ फंडाच्या नावाखाली एका होमिओपॅथी डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
fraud Crime News
fraud Crime Newsesakal
Updated on
Summary

‘सीएसआर’ फंडाच्या नावाखाली एका होमिओपॅथी डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर - ‘सीएसआर’ फंडाच्या नावाखाली एका होमिओपॅथी डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारसेने एका ड्रायव्हिंग स्कूल संचालकाकडून ‘सीएसआर’ फंडाचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे दाखवत ३५ लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर मी खोटे बोलून पैसे घेतले असे म्हणत १७ लाख रुपये परत केले व उर्वरित १८ लाख रुपयांनी गंडा घातला. यासंदर्भात ड्रायव्हिंग स्कूल संचालक मनीष वझलवार यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पारसेची वझलवार यांच्यासोबत जानेवारी २०१८ मध्ये भेट झाली होती. ड्रायव्हिंग स्कूलशी संबंधित ‘सीएसआर’ फंडचे माझ्याजवळ प्रोजेक्ट्स आहेत, अशी त्याने बतावणी केली. एक कोटीच्या ‘सीएसआर’ फंडाच्या मागे त्याने १० लाख कमिशन त्यावे लागेल, असे सांगितले व वझलवार यांना काही फाईल्स दाखविल्या. विविध सरकारी परवानग्या मिळविण्यासाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करावी लागेल, असा कांगावा करत पारसेने वझलवार यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून देण्याची मागणी केली. तसेच साडेआठ कोटींच्या ‘सीएसआर’ फंडासाठी सुमारे ८५ लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. त्याने वझलवार यांना इतर संस्थांना मिळालेल्या परवानगीची पत्रे दाखविल्याने त्यांना विश्वास बसला व त्यांनी पैसे देण्यास होकार दिला.

पारसेने सर्व प्रपोझल तयार केले व वझलवार यांच्याकडून त्यांचे तसेच त्यांचे सासरे व पत्नीची कागदपत्रे घेतली. १४ मे २०१८ रोजी पारसे वझलवार यांच्याकडे गेला व त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर एम. वझलवार बहुउद्देशीय संस्थेचा ‘सीएसआर’ फंड मंजूर झाल्याचा मॅसेज त्याने वझलवार यांना पाठविला. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून आणखी तीस लाख रुपये वेळोवेळी घेतले. वझलवार यांनी विचारणा केली असता त्याने त्यांना ‘सीएसआर’ फंडाचा डिमांड ड्राफ्ट मिळाल्याचे फोटो पाठविले व त्यांना ड्राफ्टदेखील नेवून दाखविला. मात्र, तो ड्राफ्ट त्याने कधीच बहुउद्देशीय संस्थेच्या खात्यात टाकला नाही.

मी खोटे बोललो, घटस्फोटासाठी पैसे वापरले

खात्यात डिमांड ड्राफ्ट जमा न झाल्याने वझलवार यांनी पारसे याला विचारणा केली असता त्याने मी तुमच्याशी खोटे बोललो. कुठलाही ‘सीएसआर’ फंड मिळालेला नाही. पत्नीला घटस्फोटासाठी ते पैसे दिले आहेत. तुमचे पैसे मी दोन महिन्यांत परत करतो, असे आश्वासन त्याने दिले. वझलवार यांना त्याने मार्च ते डिसेंबर २०१९ या कालावधीत १७ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. पारसेचे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यावर वझलवार यांना आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलीस ठाण्यात पारसेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.