नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान या सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान खात्याने नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच येथे अजूनही अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून शुक्रवारी दिवसभर नागपूरमध्ये पाऊस झाला. सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागपूरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.
नागपुरात कोसळत असलेल्या पावसाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आढावा घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.
महापालिकेचा नागरिकांना इशारा
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा, असा इशारा नागरिकांना महापालिकेने दिला आहे.
सतर्कता बाळगत जिल्हा व महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर
नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
रेल्वे रूळ गेले पाण्याखाली
रेल्वेच्या रूळावर जवळपास तीन ते चार फुट पाणी साचले असून रेल्वे फलाटाला सुद्धा नदीचे स्वरूप आले आहे. रेल्वे रूळ आणि फलाटावरील पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच अग्निशामक, NDRF आणि SDRF चे पथके नागपुरात बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.
पुरामुळं अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू
पुराचा सर्वाधिक फटका अंबाझरी भागात बसला असून इथं एका महिलेचा मृत्यू झाली आहे.
लष्कराच्या दोन तुकड्या बचावासाठी दाखल
NDRF आणि SDRF च्या तुकड्या मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. फडणवीसांनी नागपूरमधील पूरस्थितीबाबत सविस्तर माहिती देणारं ट्विट केलं आहे. त्यानुसा, SDRFच्या 2 तुकड्या 7 गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. NDRF आणि SDRF या पथकांनी आत्तापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.