Nagpur News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालये रुग्णांनी हाऊसफुल्ल असताना डॉक्टरांच्या दिवाळी सुट्यांसाठी ‘फिफ्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला वापरला जातो. पन्नास टक्के डॉक्टरांना दिवाळीच्या रजा देण्याचा प्रघात वर्षांनुवर्षे कायम आहे. पण रजेचा हा प्रकार रुग्णांच्या जिवाचे हाल करणारा ठरतो. ग्रामीणसह आदिवासी दुर्गम भागातून रुग्ण मेयो-मेडिकलसह सुपर स्पेशालिटीमध्ये उपचारासाठी येतात, परंतु डॉक्टरांच्या रजेमुळे त्यांना योग्य उपचारापासून मुकावे लागत आहे.
मेयो, मेडिकलसह राज्यात सुमारे २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला अडीच हजार, मेयोत २ हजार तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १ हजार रुग्णांची तपासणी होते.
उपस्थित वरिष्ठ डॉक्टरांपासून तर निवासी डॉक्टर ही तपासणी करतात. परंतु, आजघडीला मेयो-मेडिकल आणि सुपरमधील ५० टक्के प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेत आहेत. उर्वरित पन्नास टक्के डॉक्टरांच्या भरवशावर सुमारे सहा हजार रुग्णांवरील उपचाराचे आव्हान असते.
पहिल्या टप्प्यात १ ते १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात १४ ते २८ नोव्हेंबरपर्यंत डॉक्टर रजेवर आहेत. प्रशासनाला विचारणा केल्यास शिक्षक असल्याने सुट्या घेणे हा वैद्यकीय शिक्षकांचा हक्क आहे. ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला मेडिकल, मेयोत ७५ वर्षांपासून राबविला जात आहे. ५० टक्के वरिष्ठ तसेच निवासी डॉक्टर कर्तव्यावर असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत नाही, असे उत्तर नेहमीचेच झाले आहे.
साहेब मोठे डॉक्टर कधी येतील
जे पन्नास टक्के डॉक्टर उपस्थित असतात, त्यातील वरिष्ठ डॉक्टर खुर्चीत दिसत नाही. यामुळे मोठे डॉक्टर कधी येतील, अशी विचारणा एका रुग्णाने केल्यानंतर जेव्हा येतील तेव्हा या, असे उत्तर निवासी डॉक्टरांकडून मिळत असते. मेयोतील नातेवाईकांकडून अशी तक्रार करण्यात आली आहे. मेयो मेडिकल आणि सुपरमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापकांची संख्या सहाशेवर आहे.
मेयो-मेडिकल, सुपरमधील एकूण वरिष्ठ डॉक्टर
मेयोमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक - सुमारे २००
मेडिकल-सुपरमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक - सुमारे ४००
सुट्टीवर असलेले वरिष्ठ डॉक्टर
मेयो - १०० मेडिकल-सुपर - २००(Latest Marathi News)
दिवाळीत निवासी डॉक्टरांवर रुग्णांचा भार
मेयो, मेडिकलमध्ये निवासी डॉक्टर १८ तास रुग्णसेवेत असतात. कॅज्युल्टी असो की, बाह्यरुग्ण विभाग अत्यावस्थ रुग्ण उपचारासाठी आला की, तत्काळ उपचार करण्यासाठी निवासी डॉक्टरच तैनात असतात. कॅज्युअल्टीमध्ये रात्रभर रुग्ण येत असतात. अशावेळी बसण्यासाठी असलेल्या खुर्चीतच डुलकी घेत ते झोप काढतात.
दिवाळीच्या सणात तर पन्नास टक्के वरिष्ठ डॉक्टर सुटीवर असताना स्थिती आणखीच आव्हानत्मक असते. विशेष असे की, निवासी डॉक्टरही एकप्रकारे विद्यार्थी आहेत, मात्र ‘निवासी’ हे बिरुद लागल्यामुळे त्यांना दिवाळीच्या सुट्यांपासून वंचित राहावे लागते. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.