नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू ‘डोपिंग’मध्ये अडकली

तात्पुरती बंदी लागू : नागपूरच्या गौरवशाली ॲथलेटिक्स परंपरेवर पुन्हा काळा डाग
Nagpur International runner athlete caught in doping case
Nagpur International runner athlete caught in doping case
Updated on

नागपूर - नागपूरच्या गौरवशाली ॲथलेटिक्स परंपरेला पुन्हा एकदा काळ डाग लागला असून एक आंतरराष्ट्रीय धावपटू ‘डोपिंग''मध्ये सापडली आहे. ‘डोपिंग'' मध्ये अडकणारी ती नागपूरची एकूण तिसरी धावपटू व रोहिणी राऊतनंतर दुसरी महिला धावपटू होय. या घटनेमुळे नागपूरचे क्रीडा क्षेत्र हादरले आहे. ‘डोपिंग'' मुक्त करण्याच्या इराद्याने नुकतेच एक विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले असताना हे प्रकरण उघडकीस आले आहे. सध्या तिच्यावर तात्पुरती बंदी टाकण्यात आली आहे.

मे महिन्यात बंगलोर येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या काळात या खेळाडूची नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) चाचणी केली आली, असे दिल्ली येथील भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तिच्या या ‘युरीन'' चाचणीचा अहवाल जुलै महिन्यात प्राप्त झाला. त्यानुसार तिच्या ‘अ‘ नमुन्यात कामगिरी उंचावणारे १९-नोरॅंड्रोस्टेरोन (Norandrosterone) हे ॲनाबोलिक स्टेरॉईड असल्याचे सिद्ध झाले. हे स्टेरॉईड नॅन्ड्रोलोन एक प्रकार असून याचा वापर मुख्यत्वे स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी केला जातो.

यावर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने (वाडा) गेल्या ३० वर्षांपासून बंदी टाकली आहे. गेल्या महिन्यात केनियाच्या दोन धावपटूंवर याच बंदी असलेल्या ड्रग्जचा वापर केल्याबद्दल बंदी टाकण्यात आली. त्याचप्रमाणे २०१९ च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या एम. गोमतीवरही १९-नोरॅंड्रोस्टेरोन ड्रग्ज वापर केल्याबद्दल चार वर्षांची बंदी टाकण्यात आली.

तीन की चार वर्षाची बंदी?

जुलै महिन्यात या खेळाडूला अहवाल प्राप्त झाला असून पंधरा दिवसांत तिला नमुन्यात सापडलेल्या ड्रग्जबाबत सर्व पुराव्यासह नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडे खुलासा करायचा होता. त्यापूर्वी सात दिवसांच्या आत तिला ‘ब'' नमुन्याची चाचणी करायची आहे की नाही, हे एजन्सीला कळवायचे होते. हे तिने कळविले नाही तर ती आपला अधिकार गमावून बसेल आणि तिला ‘अ‘ नमुन्याचा अहवाल मान्य आहे, असे गृहीत धरल्या जाईल. आपण बंदी असलेले ड्रग्ज घेतले हे तिने मान्य केले तर नाडाच्या नियमानुसार तिला एक वर्षाची सूट देऊन तिच्यावर फक्त तीन वर्षांची बंदी टाकण्यात येईल. नुकतेच भारताची वेगवान धावपटू धनलक्ष्मी ‘डोपिंग'' मध्ये अडकल्यानंतर तिने बंदी असलेले ड्रग्ज घेतल्याचे मान्य केल्यावर तिच्यावर तत्काळ तीन वर्षाची बंदी टाकण्यात आली. पूर्वी हा कालावधी दोन वर्षांचा होता. मान्य केले नाही आणि ‘अ‘ नमुन्याचा अहवाल अंतिम ठरला तर किमान चार वर्षाची बंदी टाकण्यात येईल.

प्रशिक्षकावर कारवाई होणार का?

तीन वर्षापूर्वी मुंबईच्या एका धावपटूने ड्रग्ज घेतले होते. खेळाडूची चौकशी केल्यानंतर प्रशिक्षकावर बंदी टाकण्याविषयी राज्य संघटनेच्या बैठकीत चर्चा झाली होती. बंदी टाकली गेली असती तर प्रशिक्षकाला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघटनेच्या कुठल्याही स्पर्धा कार्यक्रम किंवा प्रक्रियेत सहभागी होता आले नसते. त्यामुळे नागपूरची खेळाडू ‘डोपिंग'' मध्ये अडकल्याने तिच्या खुलाशानंतर जर प्रशिक्षकाचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले तर त्या प्रशिक्षकावर जिल्हा किंवा राज्य संघटना नियमानुसार कारवाई करणार का, ही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.