Nagpur Lok Sabha Election Result : नागपूरच्या निकालाकडे देशाचे लक्ष! गडकरींच्या विजयापेक्षा ‘लीड’वरच अधिक चर्चा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर आणि अमरावती वगळता आठ जागांवर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते.
Nitin Gadkari vs Vikas Thakre
Nitin Gadkari vs Vikas Thakresakal
Updated on

नागपूर - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर आणि अमरावती वगळता आठ जागांवर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. ‘मोदी मॅजिक’मुळे उमेदवारांना विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नव्हते. २०२४ ची स्थिती उलट आहे. शिवसेना आणि भाजप वेगळे झाले आहेत. त्यातच नरेंद्र मोदी यांचा करिष्मा असल्याचे जाणवले नाही.

उद्‍धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बुलडाणा, अमरावती, वाशिम-यवतमाळ आणि रामटेक या मतदारसंघांमध्ये मजबूत असे संघटन आहे. सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. रामटेकमध्ये तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार-पाच दिवस मुक्कामी होते. त्यामुळे विदर्भातील मतदार महायुतीला निवडून देतात की महाविकास आघाडीला हे उद्या स्पष्ट होईल.

नागपुरात भारतातील हेविहेट उमेदवार, विकासपुरूष म्हणून नावारूपास आलेले अजातशत्रू नितीन गडकरी आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत होत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये गडकरी यांचा एकतर्फी विजय झाला होता.

यावेळी मात्र, गडकरी हटट्रिक मारणार यापेक्षा त्यांचे मताधिक्य घटणार की वाढणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. सर्वच राजकीय पक्षांना चालणारे भारतीय जनता पक्षातील एकमेव नेते म्हणजे नितीन गडकरी आहेत. ‘आम्ही भाजपला नव्हे तर नितीन गडकरी यांना मतदान केले’, अशा प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केल्या होत्या.

नितीन गडकरी यांना पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेण्याची गरज पडली नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून ते राजकारणात आहेत. ते जमिनीशी जुळलेले नेते आहेत. म्हणूनच २०१४ मध्ये २ लाख ८३ हजार तर २०१९ मध्ये २ लाख १६ हजारांच्या मताधिक्यांनी ते विजयी झाले होते.

नागपुरातून चार वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी गडकरी यांनी धुळ चारली होती. पण, २०२४ ची निवडणूक सोपी नाही. पाच लाख मतांनी विजयी होण्याचा दावा करण्यात आला असला तरी मतदान मात्र, कमी झाले. त्यामुळे विरोधक गडकरी यांच्या पराभवाची कामना करीत नसून त्यांचे मताधिक्य किती कमी होईल, याकडे नजर ठेवून आहेत.

नागपूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे तर दोनमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे मताधिक्य निदान कमी होणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनीही चांगली मेहनत घेतली असल्याने भविष्याचा विचार करता काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

धाकधूक आहेच!

नितीन गडकरी निघणार असल्याचे दावे करण्यात येत असले तरी कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक कायम आहे. कारण, समोर विकास ठाकरे यांच्या रूपाने एक चांगला आणि लढवय्या उमेदवार उभा आहे. तसेच वंचितनेही ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला तर ‘एमआयएम’नेही उमेदवार दिला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com