Nagpur Code of Conduct: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. दरम्यान या आचारसंहितेमुळे अनेक बंधने लागू झालीत. या आचारसंहितेचा सर्वांत मोठा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे. खत विक्री आचारसंहितेत अडकली आहे. रामटेक तालुक्यात भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान व फळबाग भाजीपाल्याची शेती केली जाते.
सध्या पिकांना खताची गरज आहे. मात्र, रासायनिक खते असलेल्या प्रत्येक गोण्यांवर पंतप्रधानांचे छायाचित्र असल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. स्टिकर लावून छायाचित्र झाकायचे असेल तर संबंधित कंपन्यांनीच स्टिकर पुरवावीत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जर हा खर्च विक्रेत्यांवर लादण्यात आल्यास विक्रेत्यांवर अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड लागणार आहे.
खत विभागाने देशातभारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडून खतांच्या गोण्यांवर पंतप्रधानांचे छायाचित्र असलेल्या खत गोण्यांची विक्री होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचे छायाचित्र अथवा मतदारांवर प्रभाव पडेल, असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून ते झाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचा आदेश आयोगाने जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.
त्यात खत गोण्यांचाही समावेश होत आहे. स्टिकर लावल्याचे आढळले अथवा कोणाची तक्रार आली तर संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. खत विक्रेत्यांकडे खतांचा हजारो टन साठा गोदामात आहे. शेतकरी खतांची मागणी करीत आहेत. विक्रेत्यांकडे स्टीकर नाहीत. बाजारातून अशी स्टिकर विकत आणणे दुकानदारांना परवडत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. संबंधित कंपन्यांनी छायाचित्रांवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
रंग लावण्याचीही पंचाईत
खताच्या गोण्यांवरील पंतप्रधानांच्या छायाचित्राला रंग लावायलाही दुकानदार धजत नाहीत. रंग लावून छायाचित्र झाकले तर त्याला वेगळाच ''रंग'' येण्याची भीती असल्याने संबंधित कंपन्यांनीच विक्रेत्यांना स्टिकर पुरवावीत. विक्रेते ते गोण्यांवर लावून खत विक्री करतील किंवा निवडणूक आयोगाने पर्याय काढावा, अशी विनंती खत विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
आचारसंहितेच्या कक्षेत खतांना आणायचे होते तर फोटो छापलाच कशाला? असा सवाल खतविक्रेते करीत आहेत. सध्या फळबागांना व भाजीपाला देण्यासाठी शेतकरी खतांची मागणी करीत असताना खताची विक्री करता येत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.