नागपूर : प्रवेशद्वारावर एक ते दीड कोटी रुपये खर्च करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) शोभा वाढविण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी एमबीबीएस पदवीच्या विद्यार्थ्यांची क्षमता २५० झाली असताना एकाचवेळी परीक्षेला बसतील असा हॉल (एक्झाम) मात्र येथे उपलब्ध नाही. विशेष असे की, परीक्षा हॉल तयार करण्यासाठीचा प्रस्ताव अद्याप मेडिकल प्रशासनाने तयार केलेला नाही.
मेडिकलमध्ये विकासकामांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. येथे ‘स्काय वॉक’सह प्रवेशद्वार तयार केले. नव्याने पोलिस चौकीसह वसतिगृहाचे काम सुरू आहे. गरज नसताना १०० कोटी खर्चून चार ठिकाणी पार्किंग प्लाझा तयार होत आहे. दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या टाइल्स काढून पुन्हा ग्रेनाईट लावण्यात येत आहे, परंतु ‘परीक्षा हॉल’ तयार का करण्यात येत नाही, हे मात्र कळायला मार्ग नाही.